स्पर्धेच्या युगात खेळामुळे आत्मविश्वास
हनुमंतराव रांजणे; दापवडीत क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन
भोसे, ता. २७ : खेळ म्हणजे केवळ विजय किंवा पराभव नसून ती एक जीवन जगण्याची शिस्त आहे. खेळाच्या मैदानावर जो घाम गाळतो, तोच आयुष्याच्या स्पर्धेत आत्मविश्वासाने उभा राहतो. आजच्या स्पर्धेतूनच भविष्यात देशाचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू घडतील, असा विश्वास उन्नती फिनसर्व प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष हनुमंतराव रांजणे यांनी व्यक्त केला.
दापवडी (ता. जावळी) येथील दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन श्री. रांजणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी दापवडीचे सरपंच महादेव रांजणे, दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रविकांत बेलोशे, माजी सरपंच संतोष रांजणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदाशिव रांजणे, विलास रांजणे, सागर बेलोशे, विक्रम चोरट आदी मान्यवर उपस्थित होते. हायस्कूलचे मुख्याध्यापक दीपक आखाडे, क्रीडा शिक्षक नितीन घाडगे, प्रदीप कुंभार, प्रतिभा जंगम, बाबर, श्री. फरांदे, अशोक धुमाळ व शिक्षक उपस्थित होते.
श्री. रांजणे म्हणाले, ‘‘अभ्यासाइतकाच खेळही जीवनात महत्त्वाचा आहे. नियमित खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते. मन प्रसन्न होते. खेळ आपल्याला वेळेचे नियोजन आणि एकमेकांचा सन्मान करायला शिकवतो. मैदानात जिंकण्यापेक्षा आपला खेळ किती प्रामाणिक आहे, हे महत्त्वाचे असते. हरलो तरी खचून न जाता पुन्हा उभारी घेणे आणि जिंकलो तरी गर्व न करणे, हीच खरी खेळाडूवृत्ती आहे.’’
या स्पर्धेमध्ये कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, क्रिकेट, थाळीफेक, गोळाफेक, धावणे, दोरी उड्या अशा विविध क्रीडा प्रकारात विद्यार्थी सहभागी झाले. क्रीडा स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या खेळाडू व संघांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक दीपक आखाडे यांनी प्रास्ताविक केले. नितीन घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप कुंभार यांनी आभार मानले.
चौकट
-------
शाळेच्या विकासासाठी मदत
हनुमंतराव रांजणे यांनी या वेळी शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही शाळेला सर्वतोपरी सहकार्य करत आहोत. नुकतीच कॉम्प्युटर रूमसाठी सढळ हाताने मदत केली असून, आता शाळेच्या मागणीनुसार खेळाच्या मैदानात सुसज्ज व्यासपीठ बांधण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल.’’
25B07017
दापवडी : विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना हनुमंतराव रांजणे. समवेत मान्यवर. (रविकांत बेलोशे : सकाळ छायाचित्रसेवा)