राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय पक्षांची जोरात तयारी सुरू आहे. सोलापूर महानगरपालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. सोलापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची घोषणा झाली आहे. भाजपच्या विरोधात लढण्यासाठी विरोधक एकवटलेले आहेत. आज सोलापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी जागावाटप जाहीर झाले आहे. काँग्रेस 45, शिवसेना 30, राष्ट्रवादी शरद पवार गट 20, माकप 7 जागांवर निवडणूक लढणार आहे. मात्र आता या जागावाटपानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे. सोलापूरात नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात.
मनसे ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये वादसोलापूर मध्ये भाजपला रोखण्यासाठी विरोधकांनी महाविकास आघाडीची घोषणा केली आहे. त्यानंतर जागावाटपही जाहीर झाले आहे. यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे नेत्यांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर आणि ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख यांच्यात तू तू – मैं मैं झाली. त्यामुळे एकीकडे ठाकरे बंधू एकत्र आल्याचे पहायला मिळत असताना स्थानिक स्तरावर मतभेद असल्याचे समोर आले आहे.
शिवसैनिक नाराजत्याचबरोबर महाविकास आघाडीच्या जागावाटराच काँग्रेसच्या वाट्याला ठाकरे गटापेक्षा जास्त जागा आल्याने शिवसैनिक आक्रमक झाल्याचे समोर आले आहे. ठाकरे गटाचे उत्तर विधानसभा शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी शहरप्रमुख अजय दासरी यांना याबाबत जाब विचारला. आघाडीची पत्रकार परिषद सुरु होण्याआधी आणि पत्रकार परिषद संपल्यानंतर देखील शिवसैनिकांनी अजय दासरी कमी जागाबाबत विचारणा केली.
शाब्दिक बाचाबाची…यावेळी ठाकरे गटाचे महेश धाराशिवकर आणि अजय दासरी यांच्यात शाब्दिक बचाबाची झाली असून एकमेकांना बघून घेण्याची भाषा या दोन्ही नेत्यांनी केली आहे. त्यामुळे सोलापूरात महाविकास आघाडीची घोषणा झाली असली तर पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले आहे. याचा फटका आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत बोलताना ठाकरे गटाचे नेते अजय दासरी म्हणाले की, सोलापूर महापालिकेसाठी महाविकास आघाडी झाली आहे. आम्ही भाजप विरोधात आणि विकासासाठी एकत्र आलो आहे. भाजपला हरवण्यासाठी सर्व पक्षांनी त्याग केला आहे. 4 पक्ष मिळून 102 जागा लढवतोय. मनसेही सोबत असणार आहे. काँग्रेस 45, शिवसेना 30, राष्ट्रवादी शरद पवार गट 20, माकप 7 असा फॉर्म्युला ठरला आहे.