मोखाड्यात एनएसएस स्वयंसेवकांची जनजागृती
मोखाडा, ता. २८ (बातमीदार) : डिजिटल युगात समाजमाध्यमांच्या आहारी गेलेल्या तरुणाईला सावरण्यासाठी ठाण्याच्या माजिवडे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) स्वयंसेवकांनी खोडाळा येथे प्रभावी जनजागृती मोहीम राबवली. खोडाळ्यातील आठवडे बाजारात ‘डिजिटल साक्षरतेचा’ संदेश देत विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
खोडाळ्यातील मोहिते महाविद्यालयात सुरू असलेल्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये ५० स्वयंसेवक सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मुख्य बाजारपेठ अशी रॅली काढण्यात आली. ‘सोशल मीडिया वापरा, पण मर्यादेत’ अशा घोषवाक्यांचे फलक, पत्रके आणि पथनाट्यांच्या माध्यमातून अतिवापराचे दुष्परिणाम सांगण्यात आले. प्राचार्य प्रा. विलास शेजुळ यांनी ‘डिजिटल डिटॉक्स’ आणि वेळेच्या नियोजनाचे महत्त्व पटवून दिले. सततच्या मोबाइल वापरामुळे होणारा मानसिक ताण आणि झोपेच्या विकारांबाबतही या वेळी प्रबोधन करण्यात आले. माजिवडे महाविद्यालयाने जोगलवाडी आणि राजेवाडी ही गावे दत्तक घेतली असून, या शिबिरादरम्यान स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनाधीनता यावरही भर दिला जात आहे. या उपक्रमाला खोडाळ्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.