चाकण, ता. २८ : जागतिक पातळीवरील औद्योगिक वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण शहर व परिसरात गेल्या काही वर्षापासून वाहतूक कोंडीची समस्या बिकट बनली आहे. पुणे- नाशिक महामार्ग, चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर, चाकण एमआयडीसीकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावर दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
चाकण औद्योगिक वसाहतीतील जड वाहतूक, अपूर्ण रस्ते, प्रलंबित कामे, वाढलेली खासगी वाहनांची मोठी संख्या ही कोंडीची प्रमुख कारणे आहेत. कामगार, विद्यार्थी, रुग्णवाहिकांनाही या कोंडीचा मोठा फटका बसत आहे. स्थानिक नागरिक, कामगारांनी वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने प्रशासनावर, नेत्यांवर नाराजी व्यक्त केली जात आहे.
वाहतूक पोलिस विभागाने सिग्नल व्यवस्था सुधारण्याचे, तसेच जड वाहनांसाठी ठरावीक वेळ निश्चित करण्याचे आश्वासन दिले आहे. उपाय म्हणून रस्ते रुंदीकरण, पर्यायी मार्गांची निर्मिती, सार्वजनिक वाहतूक बळकट करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ तसेच उद्योजकांचे मत आहे.
उपाययोजना करण्याची मागणी
कंपन्यांमुळे चाकणमधील रस्त्यांवर ट्रक, कंटेनर, ट्रेलर, टँकर, कामगार कर्मचाऱ्यांची वाहने, बस तसेच अवैध वाहने रिक्षा मार्गावर अस्ताव्यस्त लागत असल्याने कोंडी होत आहे. स्थानिक, कामगार संघटना, उद्योजक व्यावसायिक, ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समिती यांनी एमआयडीसी, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआयडीसी यांच्याकडे काही उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. रस्ते रुंदीकरण, सिग्नल सुधारणा, अवजड वाहनांसाठी वेळा महत्त्वाच्या आहेत. पण याकडे दुर्लक्ष होत आहे, हे वास्तव आहे.