उद्यानातील खेळणी नादुरुस्त; मुलांचा हिरमोड
संजय शिंदे ः सकाळ वृत्तसेवा
धारावी, ता. २८ (बातमीदार) : धारावीतील संत कक्कया मार्गावरील राव बहाद्दूर एन. शिवराज उद्यान हे परिसरातील मोकळ्या जागेपैकी एक महत्त्वाचे उद्यान आहे. या उद्यानात लहान मुलांसाठी विविध खेळणी बसवण्यात आली असून, खुले मैदानही उपलब्ध आहे. या मैदानावर लहान-मोठी मुले मैदानी खेळ खेळत असतात; मात्र सध्या उद्यानातील अनेक खेळणी नादुरुस्त अवस्थेत असून काही झोपाळ्यांचा केवळ सांगाडाच उभा आहे.
या सांगाड्याला दोरी किंवा कपडे बांधून मुले झोपाळा खेळण्याचा प्रयत्न करीत असल्याने अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तसेच या मोकळ्या जागेत सातत्याने विविध कार्यक्रमांसाठी मोठमोठे मंडप उभारले जात असल्याने मुलांना खेळण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही. यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
धारावी परिसरात मुलांना खेळण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा मिळावा, यासाठी हे उद्यान अत्यंत महत्त्वाचे आहे. परिसरातील अनेक घरांची जागा लहान असल्याने मुले व वृद्ध नागरिक घरात थांबू शकत नाहीत. त्यामुळे दिवसभर या उद्यानात मुलांची गर्दी असते. सकाळी व संध्याकाळी महिला-पुरुष आरोग्याच्या दृष्टीने चालण्यासाठी येथे येतात.
दरम्यान, राजकीय पक्ष, विविध संस्था-संघटना व मंडळांकडून या मैदानात कार्यक्रम घेतले जात असल्याने मोकळी जागा अडवली जाते. खेळणी नादुरुस्त असल्यामुळे लहान मुलांचा हिरमोड होत असून, ‘मोबाईलवर खेळू नका’ असे सांगितले जात असताना प्रत्यक्षात मैदानी खेळासाठी सुविधा नसतील तर मुलांनी काय करावे, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत.
उद्यानातील नादुरुस्त खेळणी दुरुस्त करण्यास किंवा नवीन खेळणी बसवण्यास प्राधान्य देण्यात येईल. स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.
- रणजित नलगे, पालिका सहाय्यक उद्यान अधीक्षक, ग/उत्तर विभाग
खेळणी सतत नादुरुस्त होत असल्याने लहान मुलांना खेळता येत नाही. त्यामुळे मुले धोकादायक पद्धतीने खेळणी वापरतात. त्यांना त्रास सहन करावा लागतो, हा त्यांचा नाईलाज आहे.
- गिरीराज शेरखाने, अध्यक्ष, जय भवानी क्रीडा मंडळ
काही वर्षांपूर्वी उद्यानाची अवस्था अतिशय दयनीय होती. नूतनीकरणानंतरही विविध समस्या कायम आहेत. सामाजिक संघटना प्रयत्न करीत असल्या तरी समस्या पूर्णतः सुटत नसल्याची खंत आहे.
- दिलीप गाडेकर, ज्येष्ठ समाजसेवक