नात्यांवरचा विश्वास उडावा अशी एक घटना समोर आली आहे. मामानेच आपल्या भाच्याची निदर्यतेने हत्या केली. मृतदेहाचे तीन तुकडे केले. तीन दिवसांच्या आत पोलिसांनी या हादरवून टाकणाऱ्या हत्याकांडाचा खुलासा केलाय. मास्टरमाइंड मामासह चार आरोपींना अटक केलीय.
नाथनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील युवक अभिषेकची निदर्यतेने हत्या करुन मृतदेहाचे तीन तुकडे केल्याचं प्रकरण समोर आलय. सुरुवातीला मोबाइलचा हफ्ता आणि मित्रांमधील आपसातला वाद या हत्येचं कारण असल्याच सांगितलं गेलं. मृत अभिषेकच्या मामाने संतोषने मीडियासमोर येऊन हे सांगितलं. पोलिसांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न होता. पण पोलिसांची कठोरतेने चौकशी आणि तांत्रिक तपासातून या हत्येचा उलगडा झाला. बिहारच्या भागलपूरमधील हे प्रकरण आहे.
तिघांनी काय सांगितलं?
पोलिसांनी आधी अभिषेकचे तीन मित्र राधे, आयुष आणि रितिक या तिघांना ताब्यात घेतलं. चौकशीतून धक्कादायक खुलासे झाले. तिघांनी कबूल केलं की, हत्येचा कट अभिषेकचा मामा संतोषने रचला होता. यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. हत्येनंतर स्वत:ला वाचवण्यासाठी संतोषनेच पोलिसांना या हत्येची माहिती दिली.
अभिषेक काय धमकी द्यायचा?
संतोषच्या प्रेयसीची अभिषेकसोबत जवळीक वाढत चालली होती हे पोलीस तपासातून समोर आलं. संतोषला हे आवडत नव्हतं. मामाचं लग्न झालेलं. अभिषेक अनेकदा मामाला, त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल मामीला सांगेल अशी धमकी द्यायचा. याच भिती आणि संशयाने मामा हैवान बनला. त्याने आपल्याच भाच्याला मार्गातून हटवण्याचा खतरनाक कट रचला.
डोकं आणि पाय गंगा नदीत फेकले
23 डिसेंबरला अभिषेकच अपहरण करण्यात आलं. 24 डिसेंबरच्या रात्री त्याला गोळी मारण्यात आली. मग, हेक्सा ब्लेडने त्याच्या शरीराचे तीन तुकडे केले. शीर नाथनगर शाहपूर भागात गंगा किनारी फेकून दिलं. डोकं आणि पाय गंगा नदीत फेकले. 26 डिसेंबरला धड मिळालं. दोन दिवसांनी पोलिसांनी शीर आणि पाय शोधून काढले.
या संपूर्ण हत्याकांडाचा खुलासा
एसएसपी हृदयकांत यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी एसपी शुभांक मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली विशेष टीम बनवण्यात आली. त्यांनी FSL ने चौकशी सुरु ठेवली. टेक्निकल पुरावे, चौकशी आणि घटनाक्रम जोडून पोलिसांनी या संपूर्ण हत्याकांडाचा खुलासा केला.