बॉलिवूडचे दिग्गज कलाकार धर्मेंद्र यांच्या शेवटच्या ‘इक्कीस’ या चित्रपटाचा खास स्क्रीनिंग सोमवारी संध्याकाळी मुंबईत आयोजित करण्यात आलं होतं. या स्क्रीनिंगला संपूर्ण देओल कुटुंबीय उपस्थित होते. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2026 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सनी आणि बॉबी देओल यांनी वडील धर्मेंद्र यांच्या आठवणीत खास या स्क्रीनिंगचं आयोजन केलं होतं. त्यामुळे देओल कुटुंबीयांसाठी हे क्षण खूपच भावनिक होते. स्क्रीनिंग सुरू होण्यासाठी सनी देओलने पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. यावेळी पाठीमागे लागलेल्या वडिलांचा मोठा फोटो पाहून तो भावूक झाला होता. त्याच्या या भावना डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसत होत्या.
सनी देओलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देताना सनी मागे लावलेला चित्रपटाचा मोठा पोस्टर पाहतो. त्यावर धर्मेंद्र यांचा फोटो असतो. “पापा तिथे आहेत, मी त्यांच्यासोबत उभा राहतो”, असं म्हणत तो फोटोपुढे उभा राहतो. यावेळी सनी देओलच्या चेहऱ्यावरील भावना स्पष्ट जाणवत होत्या. सनी देओल त्याच्या वडिलांच्या किती जवळ होता, ही बाब काही लपलेली नाही. वडिलांना गमावल्याचं दु:ख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. भावूक झालेला सनी त्याच्या वडिलांच्या मोठ्या फोटोकडे अत्यंत आपुलकीने बघत होता. त्यानंतर त्याने पापाराझींसमोर हात जोडले.
View this post on Instagram
सनीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. या स्क्रीनिंगला बॉबी देओल त्याची पत्नी, मुलगा आणि चुलत भाऊ अभय देओलसोबत पोहोचला होता. श्रीराम राघवन दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाची मुख्य भूमिका आहे. अगस्च्य हा अमिताभ आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता नंदाचा मुलगा आहे. याआधी त्याने ‘द आर्चीस’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्याच्यासोबत अभिनेत्री सिमर भाटिया, जयदीप अहलावत यांच्याही भूमिका आहेत. ‘इक्कीस’च्या या खास स्क्रीनिंगला रेखा, तब्बू, जितेंद्र, सलमान खान, लुलिया वंतूर, फातिमा सना शेख, मनिष मल्होत्रा, जिनिलिया आणि रितेश देशमुख, रणदीप हुडा यांसारखे सेलिब्रिटी उपस्थित होते.