इशान किशनने टीम इंडियात कमबॅकसाठी गेल्या काही वर्षांपासून धडपड करत होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये घाम गाळत होता. अखेर त्याला त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं. टी20 वर्ल्डकप संघात त्याची नियुक्ती झाली आहे. इशान किशनने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत केलेल्या चमकदार कामगिरीची दखल घेतली गेली. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत इशान किशनने सर्वाधिक धावा केल्या आणि जेतेपद मिळवून दिलं. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात कर्नाटकविरुद्ध 39 चेंडूत 125 धावा केल्या. पण पहिला सामना खेळल्यानंतर बीसीसीआयने त्याला आराम दिला. त्यामुळे त्यानंतर झालेल्या दोन सामन्यात इशान किशन काही खेळला नाही. इशान किशनला आराम दिल्यानंतर आता तो नेमका करतो तरी काय? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. चला जाणून घेऊयात…
इशान किशनला आराम दिला गेल्यानंतर तो थेट पटना येथील त्याच्या घरी गेला. त्यानंतर एखाद दुसरा दिवस आराम केल्यानंतर पु्न्हा एकदा मैदानात परतला. पण यावेळी प्रशिक्षकांच्या भूमिकेत दिसला. त्याने त्याच्या अकादमीतील मुलांना प्रशिक्षण देणं सुरू केलं आहे. एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात इशान किशन मुलांना क्रिकेटचे धडे गिरवायला शिकवत आहे. इशान किशनने सर्वात आधी मुलांसोबत वॉर्मअप केला आणि त्यानंतर त्यांच्यासोबत खेळला. अकादमीतील फिरकीपटू त्याला गोलंदाजी करताना दिसले.
इशान किशनची न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिका आणि टी20 वर्ल्डकपसाठी संघात निवड झाली आहे. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल की नाही हे सांगणं कठीण आहे. दुसरीकडे, त्याची निवड वनडे संघातही होण्याची शक्यता वाढली आहे. ऋषभ पंतला वनडे संघातून डावलण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात स्थान मिळू शकते. इतकंच काय तर प्लेइंग 11 चा भाग असू शकतो. गेली दोन वर्षे इशान किशन संघात परतण्यासाठी धडपड करत होता. अखेर त्याला संधी मिळाली आहे. त्यामुळे या संधीचं सोनं करणं भाग आहे.