‘जल जीवन मिशन’ची कामे रखडली
डहाणूत निधीअभावी ‘हर घर जल’चे स्वप्न अधांतरी, कंत्राटदारांची बिले थकल्याने कामे ठप्प
कासा, ता. ३० (बातमीदार) : केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी ‘हर घर नल’ योजना डहाणू तालुक्यात अद्याप पूर्णत्वास गेलेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून ठेकेदारांना कामांची बिले न मिळाल्याने तालुक्यातील बहुतांश योजना अर्धवट अवस्थेत बंद पडल्या आहेत. परिणामी, बसवलेल्या पाइपलाइनची तोडफोड आणि साहित्याची पडझड सुरू असून, शासनाचे लाखो रुपये वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
डहाणू तालुक्यातील १०७ महसुली गावांमध्ये २०२४ पर्यंत प्रत्येक घरात दरडोई ५५ लिटर शुद्ध पाणी देण्याचे उद्दिष्ट होते; मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कामे ठप्प आहेत. आदिवासीबहुल दुर्गम भागात फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाई जाणवू लागते. अशा वेळी महिलांची पायपीट थांबवण्यासाठी ही योजना महत्त्वाची होती, पण प्रशासकीय दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पाणीपुरवठा विभागाने तालुक्यातील ५६ कामे प्रगतिपथावर असल्याचे आणि ३० योजना पूर्ण झाल्याचा दावा केला असला, तरी वास्तवात चित्र वेगळे आहे. अनेक गावांत ‘हर घर जल’ घोषित होऊनही प्रत्यक्षात नळांना पाणी आलेले नाही. काही ठिकाणी जलकुंभ बांधून तयार आहेत, मात्र नळजोडणी अद्याप कागदावरच आहे.
-------------
आंदोलनाचा इशारा
कामे अर्धवट सोडून गेल्याने आधीच टाकलेल्या पाइपलाइन अनेक ठिकाणी तुटल्या आहेत. पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वी रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुक्यातील ग्रामस्थांनी दिला आहे.
-------------
जल जीवन मिशनची कामे करणाऱ्या ठेकेदारांना पत्रे व नोटिसा देऊन काम सुरू करण्यास सांगितले आहे. अनेक ठिकाणी कामे पुन्हा सुरू झाली असून, याचा दररोज आढावा घेतला जात आहे.
- अस्मिता राजापुरे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, डहाणू
-------------
डहाणू तालुक्यातील वेती वरोती ग्रामपंचायत हद्दीतील जल जीवन मिशनचे काम अपूर्ण असून, ठेकेदाराने पाइप टाकण्यासाठी खोदलेले खड्डे तसेच होते. त्यातील पाइप गायब झाल्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला. टाकी अपूर्ण असून, विहिरीदेखील अपूर्ण असल्याने ही कामे कधी पूर्ण करणार आणि नागरिकांना घरात नळाद्वारे कधी पाणी मिळणार, याबाबतीत जल जीवन मिशनचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्याविरोधात पाणीपुरवठा मंत्र्याकडे तक्रार करणार आहोत.
- अशोक भोईर, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, पालघर जिल्हा