फरार आरोपी पोलिसांच्या ‘रडार’वर
कल्याण परिमंडळात सर्वाधिक गुन्हेगार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : ठाणे शहर पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील विविध गुन्ह्यांत फरार असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी आता विशेष शोध मोहीम तीव्र केली आहे. पोलिस अभिलेखानुसार, सध्या जवळपास चारशे आरोपी वॉन्टेड असून, त्यामध्ये सर्वाधिक आरोपी कल्याण परिमंडळात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या संपूर्ण परिसराला आपल्या रडारवर घेतले आहे.
ठाणे शहर पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ३५ पोलिस ठाणे असून ते पाच परिमंडळात समाविष्ट आहेत. मागील वर्षी म्हणजे २०२४ या वर्षांत ठाणे शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत एकूण ११ हजार ९६७ गुन्हे दाखल झाले आहेत. त्या गुन्ह्यांपैकी एकूण आठ हजार ९३० गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. यावरून शहर पोलिस आयुक्तालयात गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण हे ७५ टक्के इतके आहे. यामध्ये चोरी, फसवणूक, मारहाण, अंमली पदार्थ, गंभीर गुन्हे आणि न्यायालयीन तारखांना अनुपस्थित राहिलेल्या आरोपींचा समावेश असल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले. या परिमंडळामध्ये गुन्हेगारी नेटवर्क अधिक सक्रिय असून, माहिती संकलन व तांत्रिक तपास वाढविण्यात आला आहे. परिमंडळ एक व दोनमध्येही आरोपींचा आकडा मोठा असल्याने या भागातही गुप्त बातमीदार यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. येत्या काळात फरार आरोपींवर मोठी कारवाई अपेक्षित असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचित केले आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
पोलिस आयुक्तालयाने फरार आरोपींची यादी अद्ययावत करून सर्व पोलिस ठाण्यांना पाठविली असून, सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल लोकेशन ट्रॅकिंग, रेकॉर्ड तपासणी आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास पथके काम करत आहेत. नागरिकांनीही संशयास्पद हालचालींबाबत माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आयुक्तालय स्तरावर विशेष पथके, तांत्रिक विश्लेषण कक्ष आणि परिमंडळ निहाय समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करून आरोपींच्या शोधावर भर देण्यात आला आहे.
‘वॉन्टेड’ आरोपींचा तक्ता
परिमंडळ आरोपी
ठाणे शहर -१ ७८९
भिवंडी- २ ८१९
कल्याण -३ १,१६५
उल्हासनगर -४ ७४१
वागळे इस्टेट- ५ ३९६
एकूण ३९१०