सिंगापूरमध्ये वाचनसंस्कृतीला चालना
esakal December 31, 2025 01:45 PM

टोकावडे, ता. ३० (बातमीदार) : आदर्श ग्रामपंचायत व पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मुरबाड तालुक्यातील सिंगापूर ग्रामपंचायतीने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’अंतर्गत सुसज्ज व सुविधापूर्ण वाचनालय सुरू करून ग्रामीण भागातील शैक्षणिक चळवळीला चालना दिली आहे. या वाचनालयाचा लाभ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या गावातील तरुण-तरुणींना होत असून, अभ्यासाची व वाचनाची सवय रुजण्यास मदत होत आहे.
वाचनालयाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीचे सरपंच देवराम वाघ, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य; तसेच ग्रामसेवक प्रकाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना शांत, सुरक्षित आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण उपलब्ध झाले आहे. वाचनालयात स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके, संदर्भ साहित्य व विविध मासिके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अभ्यासासाठी योग्य बैठक व्यवस्था, पुरेसा प्रकाश आणि स्वच्छतेची उत्तम सोय करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील सुविधा गावातच मिळू लागल्या असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला बळ मिळत आहे. सिंगापूर ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत असून, भविष्यातही अशा शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.