पडघा, ता. ३० (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील कादंळी गावात एका प्रसिद्ध उद्योजकावर जादूटोणा केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पडघा पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
कादंळी येथील उद्योजक व श्री मीनाक्षी फाउंडेशनचे अध्यक्ष विष्णू चंदे हे संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. ते श्री स्वामी समर्थांचे भक्त आहेत. सामाजिक कार्यादरम्यान त्यांची ओळख पुंडास येथील कॅटरिंग व मंडप व्यावसायिक पंढरीनाथ भोईर याच्याशी झाली होती. चार-पाच वर्षांपासून दोघांची ओळख होती. चार महिन्यांपूर्वी विष्णू चंदे नवीन घरात वास्तव्यास गेल्यानंतर भोईर त्यांच्या घरी लिंबू, अगरबत्ती व एका छोट्या प्लॅस्टिक बाटलीत अज्ञात द्रव्य घेऊन आला. त्याने घरातील देवांची पूजा करताना संशयास्पद विधी केल्याचे चंदे यांच्या पत्नी वैशाली चंदे यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी पतीला सतर्क केले; मात्र सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.
दरम्यान, २४ डिसेंबरला कादंळी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच विष्णू चंदे यांच्या फार्महाऊसच्या प्रवेशद्वारासमोर लिंबू, काचेच्या बाटलीत द्रव्य, अगरबत्ती, काळे उडीद, गुलाल व लाल माती ठेवलेली आढळून आली. या प्रकारामुळे गावात चर्चा सुरू झाली. संशय बळावल्यानंतर चंदे यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, २४ डिसेंबरच्या मध्यरात्री पंढरीनाथ भोईर व त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती खासगी कारमधून येऊन जादूटोण्याचे साहित्य ठेवताना दिसून आले. या आधारे चंदे यांनी पडघा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तत्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.