कुरखेडा (गडचिरोली) : अवघ्या काही वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह करून संसार थाटलेल्या जोडप्यातील प्रेम संपले आणि ते प्रेम निर्घृण हत्येत बदलले. गेवर्धा येथील देवानंद सूर्यभान डोंगरवार (वय ३२) यांची पत्नी रेखा उर्फ सोनी देवानंद डोंगरवार आणि तिचा प्रियकर विश्वजीत सांगोळे यांनी मिळून खून केला. सती नदीवर नवीन पुलाच्या बांधकाम रस्त्यावर अपघाताचा देखावा तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, रक्ताच्या ठशांनी हा खेळ उघडा पडला आणि दोघेही पोलिसांच्या तावडीत सापडले.
प्राप्त माहितीनुसार २०१८ मध्ये देवानंद डोंगरवारने आंधळी येथील रेखा उर्फ सोनी हिच्याशी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. सुरुवातीला संसार आनंदाने सुरू होता, पण काही काळानंतर राजोली येथील विश्वजीत सांगोळे याच्या संपर्कात आलेल्या रेखाने दोन महिन्यांपूर्वी घर सोडले. विश्वजीत हा गेवर्धा येथील महामार्ग बांधकाम कंपनीत वाहनचालक म्हणून काम करतो आणि त्याच कंपनीच्या बेस कॅम्पमध्ये राहतो, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. दोघेही कुरखेडा येथील राणप्रताप वाॅर्डात एकत्र राहू लागले.
Akola Crime : एसीबीच्या जाळ्यात पोलिस ठाण्याचा रायटर; अकोल्यात लाच व्यवहाराचा भांडाफोड!व्यथित झालेल्या देवानंदने पत्नीला परत येण्यासाठी कित्येकदा समजावले. प्रकरण तंटामुक्त समितीपर्यंत पोहोचले, पण रेखाने उपस्थित राहण्यास नकार दिला. फोनवरही समजावणी केली, तरी तिने "आता देवानंदसोबत संसार करायचा नाही" अशी ठाम भूमिका घेतली. समितीने विवाहबंधनातून मुक्त करण्याचा सल्ला दिला, मात्र रेखाने आंतरजातीय विवाहासाठी मिळालेले ५० हजार रुपये मला दिल्यानंतरच सोडचिठ्ठी देईन, अशी अट घातली. देवानंद नेहमीच कुरखेड्यात पत्नीकडे जाणे-येणे करायचा.
घटनेच्या दिवशी दुपारी तो पुन्हा तिच्या घरी आला. रात्री तिघांमध्ये जोरदार वाद झाला. भांडण इतके टोकाचे झाले की, देवानंदच्या डोक्यावर प्रहार करून त्याचा खून करण्यात आला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने घाबरलेल्या रेखा उर्फ सोनी आणि विश्वजीत सांगोळे यांनी देवानंदचा मृतदेह त्याच्याच मोटारसायकलने सती नदीवर नवीन पुलाच्या बांधकाम रस्त्याच्या बाजूला नेला. तेथे मृतदेह फेकून मोटारसायकल तोडून अपघात झाल्याचा देखावा तयार केला.पण हा डाव फसला! घरापासून पुलापर्यंत रस्त्यावर पडलेल्या रक्ताच्या ठशांनी पोलिसांना घटनेचा छडा लावण्यास वेळ लागला नाही. कुरखेडा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी रेखा उर्फ सोनी देवानंद डोंगरवार आणि विश्वजीत सांगोळे यांना ताब्यात घेतले.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे. देवानंद हा कुटुंबातील एकटाच मुलगा होता. दोन बहिणींचा विवाह झाला आहे, आईचे निधन झाले असून तो वडील आणि आजीसोबत गेवर्ध्यात राहायचा. घटनेची माहिती मिळताच वडील रात्रीच ओळख पटवण्यासाठी आले. या खुनामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.