दहा न्यायालयांवर बॉम्बस्फोटाची धमकी.
Marathi January 09, 2026 02:25 PM

ई-मेल मिळाल्यानंतर परिसरात शोधमोहीम

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील दहा न्यायालयीन संकुलांना गुरुवारी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर न्यायालयीन इमारती रिकामी करण्यात आल्या. सदर न्यायालयांना ई-मेलद्वारे धमकी मिळाल्यानंतर पोलीस आणि श्वानपथकांच्या मदतीने तपासणी करण्यात आली. न्यायालयीन परिसर रिकामी करून तपासणी होत असताना सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले होते. सर्व तपासणी पूर्ण झाल्यानंतर घटनास्थळी अतिरिक्त पोलीसही तैनात करण्यात आले होते. यापूर्वी अमृतसर, जालंधर आणि पटियाला येथील शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या.

पंजाबमधील फिरोजपूर, मोगा आणि रोपर येथील जिल्हा न्यायालयांनाही धमकीचे फोन आले होते. हिमाचल उच्च न्यायालयालाही धमकी मिळाल्यामुळे तेथे घबराटीचे वातावरण निर्माण झाले. जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांना त्यांच्या ई-मेलवर धमकी मिळाल्यामुळे न्यायालयीन संकुल रिकामे करण्यात आले. तथापि, ईमेलचे स्त्रोत सांगण्यास किंवा तो कोणी पाठवला किंवा त्यात काय लिहिले आहे यावर कोणत्याही अधिकाऱ्याने सविस्तर भाष्य केलेले नाही. खबरदारीचा उपाय म्हणून पार्किंग क्षेत्रात कसून तपासणी करण्यात आली. तसेच कागदपत्रे आणि कचरा असलेल्या भागात तसेच गर्दीच्या ठिकाणी श्वानपथकाद्वारे संशयास्पद वस्तूचा शोध घेण्यात आला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.