10 चौकार आणि 2 षटकार… दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजाचा मैदानात कहर! नॉकआउट सामन्यात खेळली धडाकेबाज खेळी
Marathi January 12, 2026 08:25 PM

विजय हजारे स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात उत्तर प्रदेश आणि सौराष्ट्र यांच्यात लढत होत आहे. प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेशने 50 षटकांत 8 गडी गमावून धावफलकावर 310 धावा उभारल्या आहेत. युपीकडून अभिषेक गोस्वामीने उत्कृष्ट फलंदाजी करत 88 धावांची वेगवान खेळी केली.

मात्र, संघाच्या मधल्या फळीतील कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. 179 धावांवर 5 गडी गमावल्यानंतर युपीचा संघ एका क्षणी अडचणीत सापडला होता. अशा परिस्थितीत, शेवटच्या षटकांमध्ये समीर रिझवीने बॅटने जबरदस्त धुमाकूळ घातला. त्याने आपल्या धडाकेबाज खेळीत 10 चौकार आणि 2 षटकार ठोकले.

उपांत्यपूर्व सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या उत्तर प्रदेशची सुरुवात चांगली झाली नाही. आर्यन जुयाल खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर ऋतुराज शर्माही केवळ 12 धावा करून बाद झाला. तर, प्रियम गर्ग चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवण्यात अपयशी ठरला आणि 35 धावा करून चालता झाला. कर्णधार रिंकू सिंगची बॅटही शांत राहिली आणि तो अवघ्या 13 धावांवर बाद झाला. यानंतर समीर रिझवी मैदानात उतरला.

समीरने अभिषेकसोबत पाचव्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. अभिषेक 82 चेंडूत 88 धावा करून बाद झाला. त्यानंतर संघाला सावरण्याची जबाबदारी समीरने आपल्या खांद्यावर घेतली. त्याने आक्रमक पवित्रा घेत अवघ्या 77 चेंडूत 88 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. समीरच्या या तुफानी खेळीमुळेच युपीचा संघ 310 धावांच्या आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला.

दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2026 साठी समीर रिझवीला संघात कायम ठेवले आहे. समीर त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये समीरने सातत्याने चांगली कामगिरी करून दाखवली आहे. यासोबतच त्याने आपल्या तुफानी फलंदाजीची झलक इंडियन प्रीमियर लीगमध्येही दाखवली आहे. गेल्या हंगामात खेळलेल्या 5 सामन्यांत समीरने 153 च्या स्ट्राईक रेटने 121 धावा कुटल्या होत्या, ज्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश होता. दिल्लीने गेल्या वर्षीच्या लिलावापूर्वी त्याला सीएसकेकडून ट्रेड करून आपल्या संघात सामील करून घेतले होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.