राज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. या निवडणुकीला तीन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे प्रचार हा अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची tv9 मराठीचे मॅनेजिंग एटिडर उमेश कुमावत यांना मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि UBT गटाचे उद्धव ठाकरे यांच्या युतीवर भाष्य केले आहे. ते आता काय म्हणाले चला जाणून घेऊया…
या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 66 बिनविरोध जागा निवडून आल्या त्यावर वक्तव्य केले. ते म्हणाले, फक्त आमचे आले हे म्हणणं चुकीचं आहे. अपक्ष आणि इस्लामिक पार्टीचाही आला. अपक्षाची काय ताकद असते. पण तोही आला ना. किरीट सोमय्यांचे सुपुत्र नील सोमय्यांच्या विरुद्ध काँग्रेसने उमेदवार नाही दिला,. उबाठाने नाही दिला. शरद पवारांनी नाही दिला. अपक्ष उमेदवार त्यांच्या पुढे आहे. अनेक ठिकाणी त्यांना उमेदवार नाही सापडले. याचं उदाहरण कल्याण डोंबिवली आहे. कल्याण डोंबिवलीत आमचे मागच्यावेळी १०५ निवडून आले. आमची शक्ती वाढली. उद्दव ठाकरेंची शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडे आली. त्यांच्याकडे नेतेच राहिले नाही.
“दीड दोन वर्षात कोणत्या भागात जाऊन यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलं”
पुढे ते म्हणाले की, आम्ही आघाडी केल्यावर महापालिका वनसाईड झाली. दुसऱ्या पक्षांचं अस्तित्व संपलं. अनेक वॉर्डात यांना उमेदवारच मिळाले नाही. जर उमेदवार देणार नसतील तर आम्ही स्वत आणून उभे करायचे का. भारताच्या लोकसभेत ३५ खासदार बिनविरोध गेले. त्यातील ३२ काँग्रेसच्या काळात गेले. पहिल्या तीन निवडणुकीचं सोडून द्या. आताचं आहे. मागच्या निवडणुकीत गेले. लोकसभेत बिनविरोध जाऊ शकतात. तर महापालिकेत का जाऊ शकत नाही. मुंबई नाशिकच्या बाहेर हे प्रचाराला गेले सांगा. दीड दोन वर्षात कोणत्या भागात जाऊन यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलं. आपण हरलो तर ब्रँड राहणार नाही. म्हणून घराबाहेर पडले नाही. दोघे एकत्र आले तर कोणता तीर मारला. १६ तारखेला दिसेल ना काय झालं ते.
“सर्वात मोठं नुकसान राज ठाकरेंना होईल”
मुलाखतीमध्ये पुढे देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूच्या युतीवर देखील वक्तव्य केले. ‘आम्ही तीन पक्ष आहोत. आमच्यासोबत स्पेस नाही. जेव्हा आले तेव्हा हिंदुत्व घेतलं होतं. आता त्यांनी हिंदुत्व सोडून दिलं. त्यांनी जुनीच भूमिका घेतली. त्यांनी मराठी माणसाबद्दल बोलले तर हरकत नाही. पण रिक्षावाल्यांना मार, टॅक्सीवाल्यांना मार हे काही आम्हाला जमणार नाही. त्यांचं आणि आमचं जमलं नाही. ते काही आमचे शत्रू नाही. ते पुढेही मित्रच राहतील. पण या निवडणुकीत त्यांची आणि आमची वैचारिक लढाई आहे. मी मित्र म्हणून नाही राजकीय निरीक्षक म्हणून सांगतो. सर्वात मोठं नुकसान राज ठाकरेंना होईल.’