टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दोन्ही संघ दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. उभयसंघातील दुसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना हा राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. भारताने रविवारी 11 जानेवारीला सलामीचा सामना जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली. भारताने न्यूझीलंड विरुद्ध 301 धावांचं आव्हान 49 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. आता भारतीय संघ दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. मात्र या सामन्याआधी भारताची आकड्यामुळे चिंता वाढली आहे. भारताची राजकोटमधील वनडे क्रिकेटच्या इतिहासातील आकडेवारी चिंताजनक आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) गेल्या काही वर्षांपासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये दबदबा आहे. भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी केलीय. भारताने शेवटच्या एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवलाय. तसेच एकदिवसीय संघात एकसेएक आणि तोडीस तोड खेळाडू आहेत. मात्र राजकोटमधील भारताची आकडेवारी हा चिंतेचा विषय आहे. भारताने या मैदानात किती सामने खेळलेत आणि त्यापैकी किती जिंकलेत? हे जाणून घेऊयात.
भारताचा बुधवारी राजकोटच्या इतिहासातील पाचवा एकदिवसीय सामना (Team India Odi Record at Rajkot) असणार आहेत. भारताला याआधी झालेल्या 4 पैकी एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. भारताने या मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक 2 तर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी 1-1 एकदिवसीय सामना खेळला आहे. मात्र त्यापैकी फक्त एकाच सामन्यात भारताला विजय मिळवता आलाय.
भारताला 2013 साली या मैदानातील आपल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडकडून 9 धावांनी पराभूत व्हावं लागलं होतं. त्यानंतर 2 वर्षांनी 2015 मध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेकडून 18 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
भारताने राजकोटमध्ये आपल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभवाची हॅट्रिक टाळत विजयाचं खातं उघडलं. भारताने ऑस्ट्रेलियाचा या मैदानात 36 धावांनी धुव्वा उडवला. मात्र ऑस्ट्रेलियाने त्यानंतर 2023 मध्ये झालेल्या सामन्यात पलटवार केला. कांगारुंनी 2025 मध्ये हा सामना 66 धावांच्या अंतराने जिंकून 2023 मधील पराभवाची परतफेड केली. त्यामुळे आता टीम इंडिया बुधवारी दुसऱ्या सामन्यात कशी कामगिरी करते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.