विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. उपांत्यपूर्व फेरीचे सामने पार पडले आहेत. पंजाब आणि मध्य प्रदेश यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत झाली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल मध्य प्रदेशच्या बाजूने लागला. पण प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय मात्र फसला. कारण पंजाबने प्रथम फलंदाजी करत त्याचा पुरेपूर फायदा घेतला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 गडी गमवून 345 धावा केल्या. तसेच विजयासाठी 346 धावांचं आव्हान दिलं. पण हे आव्हान गाठताना मध्य प्रदेशचा 31.2 षटकात 162 धावा करू शकला. पंजाबने हा सामना 183 धावांनी जिंकला आणि उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत पंजाबचा सामना सौराष्ट्रशी होणार आहे. हा सामना 16 जानेवारीला होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत पोहोचेल. अंतिम फेरीचा सामना 18 जानेवारीला होणार आहे.
पंजाबकडून हरनूर सिंग आणि प्रभसिमरन सिंग यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली. पहिल्या विकेसाठी मध्य प्रदेशला 22 षटकापर्यंत वाट पाहावी लागली.हरनूर सिंग 51 धावा करून बाद झाला. त्यानंतर प्रभसिमरन सिंग आणि अनमोलप्रीत सिंग यांनी डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी या दोघांनी 39 धावांची भागीदारी केली. अनमोलप्रीत सिंग आणि नमन धीर यांच्यात 44 धावांची भागीदारी, अनमोलप्रीत आणि नेहल वढेरा यांच्यात 76 धावांची भागीदारी, अनमोलप्रीत सिंग आणि रमनदीप यांच्यात 36 धावांची भागीदारी, तर सनवीर सिंग आणि रमनदीप सिंग यांच्यात 34 धावांची भागीदारी झाली. प्रभसिमरन सिंगने 86 चेंडूत 88, अनमोलप्रीत सिंगने 62 चेंडूत 70, नेहल वढेराने 38 चेंडूत 56 धावा केल्या. मध्य प्रदेशकडून त्रिपुरेश सिंगने 2, वेंकटेश अय्यरने 2, आर्यन पांडेने 1 आणि कुलदीप सेनने 1 गडी बाद केला.
पंजाबने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मध्य प्रदेशचा डाव पत्त्यासारखा कोसळला. अवघ्या 162 धावांवर सर्व गडी बाद झाले. यश दुबे 3, हिमांशु मंत्री 18, शुभम शर्मा 24, रजत पाटीदार 38, वेंकटेश अय्यर 0, सारांश जैन 6, त्रिपुरेश सिंग 31, आर्यन पांडे 13, कुमार कार्तिकेय 0 अशा धावा करून बाद झाले. पंजाबकडून सनवीर सिंगने 3, गुरनूर ब्रारने 2, कृष भगत 2, रमनदीप सिंग 2 आणि मयंक मार्केंडेयने 1 विकेट घेतली.