Indian Erapes Export to Dubai - इंदापूर तालुक्यातील ‘ब्लॅक जंबो’ हा द्राक्ष वाण सध्या मलेशिया, थायलंड, चीन आणि दुबई यांसारख्या देशांतील ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. विशेषतः दुबईतून या द्राक्षाला चांगली मागणी आहे. सध्या तालुक्यातून दररोज दोन ते तीन कंटेनरच्या माध्यमातून सुमारे ३० ते ४० टन द्राक्षे व्यापाऱ्यांकरवी निर्यात केली जात आहेत.
‘ब्लॅक जंबो’ या वाणाची चव, आकार आणि टिकाऊपणा यामुळे विदेशी बाजारपेठेत या द्राक्षांना चांगली किंमत मिळत आहे. यंदा निर्यातक्षम काळी जंबो द्राक्ष १९० ते २०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. थेट बागेत पॅकिंग करून वातानुकूलित कंटेनरच्या माध्यमातून द्राक्ष परदेशात पाठविली जात आहे.
दरवर्षी सरासरी १५ ते २० हजार टन द्राक्षे निर्यात करून तालुक्यातील शेतकरी चांगले उत्पन्न मिळवत आहेत. आखाती देशात इंदापुरातील द्राक्षाने चांगली गोडी निर्माण केली असून, तेथील ग्राहकांच्या जिभेला चवीची भुरळ घातली आहे. यामुळे परदेशातील मागणीनुसार यंदाही तालुक्यातून १५ ते २० हजार टन द्राक्ष व्यापाऱ्यांकरवी निर्यात केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
तालुक्यात सुमारे अडीच हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र द्राक्ष लागवडीखाली आहे. बदलत्या वातावरणाला तोंड देत शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी करून, दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेतले आहे. रात्रीचा दिवस करून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कष्टामुळे येथील द्राक्षांचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर अव्वल ठरला आहे.
ज्याप्रमाणे परदेशातील ग्राहकांच्या पसंतीस येथील द्राक्ष उतरली आहे, त्याप्रमाणे उत्पादन व निर्यातीत तालुक्यातील शेतकरी कायम अग्रेसर राहिले आहेत. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर द्राक्षाचे उत्पादन, विक्री व निर्यातीत तालुक्याने आपले स्थान कायम ठेवल्याचे बोलले जात आहे.
निर्यातीच्या यशामागे तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांची मोठी मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कारणीभूत आहे. शेतकऱ्यांच्या या जिद्दीला दाद देण्यासाठी द्राक्ष बागायतदार संघाकडून दरवर्षी शेतकरी मेळावा आयोजित केला जातो. उत्कृष्ट उत्पादन घेणाऱ्या आणि विक्रमी निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांचा विशेष सन्मान केला जातो. या पुरस्कारांमुळे इतर शेतकऱ्यांनाही दर्जेदार उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळत असते.
- गणेश सांगळे, मानद सचिव, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ
दुबईतील ग्राहकांकडून सर्वाधिक पसंती
इंदापूर तालुक्यातील द्राक्षांना जगभरातून मागणी असली, तरी दुबईतील ग्राहकांकडून ब्लॅक जंबो वाणाला सर्वाधिक पसंती मिळत आहे. या द्राक्षांची गोडी आणि गुणवत्ता दुबईच्या बाजारपेठेत इतर स्पर्धकांच्या तुलनेत उजवी ठरत आहे. यामुळेच दरवर्षी निर्यातीचा मोठा हिस्सा केवळ आखाती देशांमध्ये पाठवला जातो. नैसर्गिक संकटांवर मात करत इंदापूरच्या द्राक्षांनी जागतिक बाजारपेठेत आपले स्थान पक्के केले आहे.