Srirampur Crime: रात्रीच्या दरम्यान दोन गटांत धुमश्चक्री; वाहनांची ताेडफाेड, श्रीरामपूर तालुक्यातील घटना, एकजण बेपता!
esakal January 14, 2026 02:45 AM

श्रीरामपूर : नायगाव (ता. श्रीरामपूर) येथील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपशाच्या कारणावरून रविवारी (ता. ११) रात्री दोन गटांत धुमश्चक्री उडाली. या घटनेत दोन वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या, तर एक जेसीबी थेट नदीपात्रात लोटून देण्यात आला. या गोंधळात एक तरुण जखमी झाला असून, एकजण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

माेठी बातमी! केवायसीनंतर अनेक ‘लाडक्या बहिणी’ अपात्र; गोरगरीब महिलांना लाभापासून वंचित राहण्याची वेळ, शासन करतय काय?

इतकी गंभीर घटना घडूनही दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत या घटनेतील जखमी व्यक्ती तालुका पोलिस ठाण्यात पोहोचलेलाच नव्हता. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच झालेली नव्हती. प्राथमिक माहितीनुसार जमिनीच्या व्यवहारातून हा वाद उफाळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. नायगाव परिसरात गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असून, महसूल विभागाकडून याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

आठ दिवसांपूर्वी महसूल विभागाच्या एका वाहनाचे वाळू माफियांकडून नुकसान करण्यात आले होते. मात्र, त्या प्रकरणीही कोणतीही तक्रार दाखल न झाल्याने वाहनाचे नुकसान भरून देण्यात आल्याची चर्चा आहे.

दरम्यान, रविवारी रात्री दोन गटांत सुरवातीला शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर हा वाद हिंसक संघर्षात बदलला. शेकडो तरुणांचा जमाव यावेळी घटनास्थळी होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथकाने रात्री घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्यावेळी ठोस पुरावे हाती लागले नाहीत. आज (ता. १२) उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्यासह पथकाने पुन्हा घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Karad News: ऊस आंदोलन खटल्यानिमित्त दिसले ऋणानुबंध; शेतकरी संघटनेचे तीन नेते अनेक वर्षांनंतर एकत्र; जुन्या आठवणींना उजाळा!

त्यानंतर काही तक्रारदार सकाळी ११ वाजल्यापासून तालुका पोलिस ठाण्यात आले होते. मात्र घटनेतील जखमी न आल्याने रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल झालेली नव्हती. जमिनीच्या व्यवहारासाठी एकत्र आलो असताना वाद झाला, त्यात एकजण जखमी झाला व एकजण बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.