पादचाऱ्यांच्या जीवाला घोर
तारापूर एमआयडीसीत पदपथांचा अभाव
बोईसर, ता. १२ (वार्ताहर) ः राज्यातील मोठ्या औद्योगिक पट्ट्यांपैकी एक असलेल्या तारापूर औद्योगिक वसाहतीत विकासाचे दावे केले जातात. मात्र, अंतर्गत तसेच मुख्य रस्त्यांवर पदपथांची व्यवस्था नसल्याने पादचाऱ्यांच्या जीवाला घोर लागला आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीतील औद्योगिक क्षेत्रात सुमारे २,१०० भूखंड असून, १२०० हून अधिक कारखाने, गोदामे कार्यरत आहेत. मात्र, औद्योगिक क्षेत्रातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर पादचाऱ्यांसाठी पदपथ नसल्यामुळे कामगार, विद्यार्थी, रुग्ण तसेच प्रवाशांना दररोज विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली असून, नागरिकांची सुरक्षितताच धोक्यात आली आहे.
-----------------------------
अपघातांमध्ये वाढ
- कारखान्यांकडे जाणारे रस्ते खड्डेमय झाले आहेत. उखडलेल्या डांबरामुळे सर्वत्र धूळ, खडी पसरली आहे. यामुळे वाहन पंक्चर होणे, घसरणे तसेच किरकोळ, गंभीर अपघातांच्या घटना वारंवार होत आहेत.
- औद्योगिक क्षेत्रालगत हातगाडीवाले, छोटे दुकानदार, लघु व्यवसाय करणारे मोठ्या संख्येने आहेत. मात्र, ट्रक टर्मिनलची सुविधा नसल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी वाहने उभी राहत असल्याने मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे.
--------------------------
नवीन कामांमध्ये पदपथांचे नियोजन केलेले आहे. यासाठीच्या निधीची तरतूद करण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच औद्योगिक वसाहतीतील पादचाऱ्यांचा प्रश्न मिटणार आहे.
- अविनाश संखे, उप-अभियंता, बांधकाम विभाग, एमआयडीसी तारापूर
----------------------------
तारापूर औद्योगिक क्षेत्रात रस्ते तयार झाले असले तरी पदपथ नसल्यामुळे रस्त्यावरून चालावे लागते. अशातच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.
- पंढरीनाथ पाटील, कामगार, तारापूर औद्योगिक क्षेत्र