इराणमध्ये सध्या मोठं जन आंदोलन उफाळून आलं आहे, लोक थेट तेथील सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनामध्ये आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. इराणमध्ये मोठी अराजकता निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे या आंदोलनाला अमेरिकेचं पाठबळ असल्याचा देखील आरोप केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबद्दल केलेले वक्तव्य पहाता मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्याकडून तर थेट इराणवर हल्ल्याचा देखील इशारा देण्यात आला होता. दरम्यान इराण आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढत असतानाच आता सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे आता इस्रायल आक्रमक भूमिकेत आलं असून, इस्रायलचे अधिकृत सरकारी विमान विंग ऑफ जॉयनने इस्रायलची हद्द सोडली आहे. हे विमान आता भूमध्य सागराकडे झेपावले आहे, कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणवर हल्ला झाल्यास भीषण युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
फ्लाइट डेटानुसार विंग ऑफ जॉयनने दक्षिण इस्रायलच्या जवळ असलेल्या नेवाटिम एअर फोर्स बेसवरून उड्डाण केलं आहे. हे विमान आता थेट दक्षिण भूमध्य सागराच्या दिशेनं झेपावलं आहे. त्यामुळे आता अशी देखील अटकळ बांधली जात आहे की, कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला होऊ शकतो, तर दुसरा असा देखील अंदाज वर्तवण्यात येत आहे की, इराणकडून इस्रायलवर हल्ला होऊ शकतो, इराणच्या मिसाईल हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी इस्रायलने हे पाऊल उचललं आहे. तर दुसरीकडे अमेरिकेनं देखील मदतीचं आश्वासन दिल्यामुळे आता तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेईविरोधत वातावरण चांगलंच तापलं आहे.
भारताकडून अॅडव्हायझरी जारी
दरम्यान आता भारतानं आपल्या इराणमधील नागरिकांसाठी अॅडव्हाझरी जारी केली आहे. इराणमध्ये सध्या प्रचंड तणाव आहे, असुरक्षित वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे इराणमधील भारतीय लोकांनी तातडीने इराण सोडून देशात परतावं अशी अॅडव्हायझरी भारताकडून जारी करण्यात आली आहे. भारताच्या दूतावासाकडून ही अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे, दरम्यान भारताकडून जारी करण्यात आलेली ही अॅडव्हायझरी म्हणजे युद्धाचे संकेत मानल्या जात आहेत, कारण इराणमध्ये आता कोणत्याही क्षणी अमेरिका किंवा इस्रायलकडून हल्ला होऊ शकतो अशी शक्यता असल्यानं भारतानं आपल्या नागरिकांसाठी ही अॅडव्हायझरी जारी केली आहे.