'या' अभिनेत्रीला 18 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या अभिनेत्याने जबरदस्तीने केलं होतं किस, अभिनेत्री झालेली अस्वस्थ
Tv9 Marathi January 15, 2026 02:46 AM

Bollywood Actress : बॉलिवूडच्या या जगात अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या अनेकांना माहिती नाहीत. याच इंडस्ट्रीमधील काही घटना अनेक वर्षानंतर सध्या समोर येऊ लागल्या आहेत. यामध्ये कास्टिंग काउच, कलाकारांवरील अन्याय आणि शूटिंगदरम्यान झालेल्या गैरवर्तनाच्या घटनांचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका धक्कादायक घटनेबाबत सांगणार आहोत, जी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. ही घटना तब्बल 56 वर्षांपूर्वी घडली होती आणि त्यात बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा समावेश होता.

रेखा या बॉलिवूडमधील अत्यंत लोकप्रिय आणि प्रतिभावान अभिनेत्री मानल्या जातात. आपल्या दमदार अभिनयामुळे आणि वेगवेगळ्या भूमिका साकारण्याच्या धाडसामुळे त्यांनी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात घडलेल्या एका प्रसंगामुळे मोठा वाद झाला होता.

15 वर्षीय अभिनेत्रीला जबरदस्ती केलं किस

1969 मध्ये रेखा ‘अंजाना सफर’ या चित्रपटाचे शूटिंग करत होत्या. काही कारणांमुळे हा चित्रपट तब्बल 10 वर्षे प्रदर्शित होऊ शकला नाही. मात्र, 1979 मध्ये हा चित्रपट ‘दो शिकारी’ या नावाने प्रदर्शित झाला. रेखा यांच्या जीवनावर आधारित ‘रेखाः द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेल्या एका गंभीर घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. या चित्रपटात रेखा यांच्यासोबत अभिनेता विश्वजीत चटर्जी मुख्य भूमिकेत होत्या. शूटिंगच्या वेळी रेखा केवळ 15 वर्षांच्या होत्या तर विश्वजीत चटर्जी यांचे वय सुमारे 33 वर्षे होते. दोघांमध्ये तब्बल 18 वर्षांचे वयाचे अंतर होते.

या चित्रपटातील एक रोमँटिक सीनमध्ये किसिंग सीन शूट केला जाणार होता. मात्र, रेखा यांना या सीनबाबत आधी काहीच कल्पना देण्यात आली नव्हती असे सांगितले जाते. शूटिंग सुरू होताच दिग्दर्शकाने ‘ॲक्शन’ म्हटले आणि विश्वजीत चटर्जी यांनी रेखा यांना किस करण्यास सुरुवात केली.

किसिंग सीनमुळे रेखा अस्वस्थ

यामुळे परिस्थिती बिघडली. किसिंग सीन अपेक्षेपेक्षा अधिक वेळ सुरू राहिला आणि रेखा अस्वस्थ झाल्या. त्या रडू लागल्या. मात्र दिग्दर्शकाने तात्काळ कट म्हटले नाही. सेटवर उपस्थित काही लोकांनी याकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी शेरेबाजी केल्याचेही सांगितले जाते. रेखा यांच्या अश्रूंना त्या क्षणी कोणीही थांबवले नाही ही बाब अत्यंत धक्कादायक होती.

या सीनमुळे मोठा वाद निर्माण झाला. अखेरीस सेन्सॉर बोर्डाने हा सीन चित्रपटातून काढून टाकण्याचे आदेश दिले. आजच्या काळात या घटनेकडे पाहिले असता कलाकारांच्या सुरक्षिततेबाबत आणि संमतीच्या महत्त्वाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होतात.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.