संकटमोचक, कधीही, कुठेही आणि कोणत्याही स्थितीत बॅटिंगसाठी सज्ज असलेला केएल राहुल याने केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने राजकोटमध्ये न्यूझीलंडसमोर विजयासाठी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 285 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 284 धावा केल्या. भारतासाठी केएलच्या शतकाव्यतिरिक्त कर्णधार शुबमन गिल याने अर्धशतक झळकावलं. तसेच इतर फलंदाजांनी छोटेखानी मात्र महत्त्वपूर्ण खेळी करत योगदान दिलं. त्यामुळे आता टीम इंडिया सलग दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकणार की न्यूझीलंड विजयाचं खातं उघडणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
न्यूझीलंडने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारताला रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने अप्रतिम सुरुवात करुन दिली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र न्यूझीलंडने 70 धावांवर भारताला पहिला झटका दिला. भारताने रोहितच्या रुपात पहिली विकेट गमावली. रोहितने 24 धावा केल्या. न्यूझीलंडने त्यानंतर भारताला ठराविक अंतराने झटपट 3 झटके दिले. शुबमन गिल 56, श्रेयस अय्यर 8 आणि विराट कोहली याने 23 धावा केल्या. त्यामुळे भारताची 4 आऊट 118 अशी स्थिती झाली.
केएल-जडेजाची महत्त्वपूर्ण भागीदारीत्यानंतर केएल राहुल आणि रवींद्र जडेजा या दोघांनी भारताच्या डावाला स्थिरता दिली आणि पाचव्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी केली. केएल आणि जडेजाने 88 बॉलमध्ये 73 रन्सची पार्टनरशीप केली. जडेजाला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र जडेजा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. जडेजाने 44 बॉलमध्ये 1 फोरसह 27 रन्स केल्या.
नितीशची केएलला भक्कम साथजडेजानंतर मैदानात आलेल्या ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याने केएलला अप्रतिम साथ दिली. नितीशने केएलसह 57 धावांची भागीदारी केली. नितीश 20 धावा करुन माघारी परतला. न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या सामन्यात 29 धावा करणाऱ्या हर्षित राणा याला राजकोटमध्ये काही खास करता आलं नाही. हर्षितने 2 धावा केल्या.
त्यानंतर केएल आणि मोहम्मद सिराज या दोघांनी आठव्या विकेटसाठी 16 बॉलमध्ये 28 रन्स जोडल्या. केएलने या दरम्यान एकदिवसीय कारकीर्दीतील आठवं तर न्यूझीलंड विरुद्धचं दुसरं एकदिवसीय शतक झळकावलं. केएलने 92 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 112 धावा केल्या. तर सिराजने 2 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी क्रिस्टियन क्लार्क याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
न्यूझीलंडसाठी ‘करो या मरो’ सामनादरम्यान टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताला राजकोटमध्ये विजय मिळवून मालिका नावावर करण्याची संधी आहे. तर न्यूझीलंडसाठी हा सामना प्रतिष्ठेचा आहे. अशात आता या सामन्याच्या निकालाकडे क्रिकेट चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे.