Mumbai Municipal Election : 'मतदान केंद्रावर EVM मशिन्स पडताहेत बंद, तर काही मशिन्सला बसतोय करंट'; मनसे नेते अविनाश जाधव यांचा गंभीर आरोप
esakal January 15, 2026 04:45 PM

Mumbai Municipal Election 2026 : मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील विविध मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिन्स तसेच मतदार याद्यांबाबत मोठ्या प्रमाणात घोळ सुरू असल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. अनेक मतदारांना दीड ते दोन तास रांगेत उभे राहावे लागत असून, काही ठिकाणी ईव्हीएम मशिन्स अचानक बंद पडत असल्याचे, तर काही ठिकाणी मशिन्सना करंट लागत असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले. अविनाश जाधव माध्यमांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, जर अशा पद्धतीने मतदान प्रक्रिया सुरू राहणार असेल आणि मतदारांना सतत त्रास सहन करावा लागणार असेल, तर ईव्हीएमचा आग्रह कशासाठी? बॅलेट पेपरवर निवडणुका का घेऊ नयेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

निवडणूक आयोगाकडून सरकारला मदत होईल अशाच प्रकारच्या कृती केल्या जात असल्याचा आरोप करत, इतर बाबींप्रमाणेच मतदारांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. “मला यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

Nanded Municipal Election : नांदेड महापालिका निवडणुकीतील उमेदवाराच्या पतीवरील हल्ला दरोड्याच्या उद्देशाने; पोलिस तपासात उलगडा, सात संशयित ताब्यात

यावेळी त्यांनी मतदार याद्यांतील त्रुटींवरही गंभीर आक्षेप घेतला. मागील वेळी आमदारकीच्या निवडणुकीत मतदान केलेल्या अनेक मतदारांची नावे यावेळी यादीत आढळत नसल्याचे त्यांनी सांगितले. नाव कट कोण करत आहे, याबाबत प्रश्न उपस्थित करत मतदार यादी सतत का बदलली जाते, असा सवाल त्यांनी केला.

काही ठिकाणी दुबार नावे कायम आहेत, तर ज्यांची एकाच ठिकाणी नोंद आहे अशा मतदारांची नावे कट करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. निवडणूक आयोगाने अशा प्रकारचा गोंधळ घालून मतदान प्रक्रिया राबवली, तर मतदारांनी नेमके लोकशाहीसाठी मतदान करायचे की हुकूमशाहीकडे नेणाऱ्या प्रक्रियेसाठी, असा प्रश्न निर्माण होतो, असे मत अविनाश जाधव यांनी व्यक्त केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.