पनवेलमध्ये किरकोळ वादाच्या घटना
esakal January 16, 2026 05:45 AM

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १५ : पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज (ता. १५) ६५६ मतदान केंद्रांवर पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४४ टक्के मतदानाची नोंद झाली होती. सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम बंद पडण्याच्या घटना घडल्या. पनवेलमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीचे उमेदवार समोरासमोर आल्याने वातावरण ताणले गेले होते, मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्याने अधिक वाद टळला.

सकाळी साडेसात वाजल्यापासून सर्व मतदान केंद्रांवर मतदान वेळेत सुरू झाले. मतदान केंद्रांच्या बाहेर वाद होऊ नये, याकरिता मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खारघर, कामोठे, तळोजा आणि खुटारी या भागात सकाळच्या सुमारास ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारी समोर आल्या. प्रशासनाने वेळीच दखल घेत पर्यायी मशीन पाठवल्यामुळे उशिराने मतदान सुरू झाले, परंतु दुपारनंतर मतदान सुरळीत झाले.

खारघर येथील विबग्योर शाळेत मतदान करण्याची मशीन बंद पडल्याची तक्रार समोर आली. तसेच पनवेल तालुक्यातील खुटारी गावात मशीन बंद पडल्याची तक्रार आली. मशीनमधील बिघाड दूर झाल्यानंतर मतदान सुरू झाले. महापालिकेतर्फे कळंंबोली, नवीन पनवेल आणि खारघर येथे विविध रंगांची थीम असलेले मतदान केंद्र तयार केली होती. या मतदान केंद्रांवर आलेले मतदार सजावट पाहून भारावून गेले. कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पनवेलमध्ये प्रभाग क्रमांक १९ येथे मतदारावर दबाव टाकण्याच्या घटनेमुळे भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. या वेळी पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करीत मतदाराला धमकावणाऱ्या कार्यकर्त्याला बाहेर काढल्याने अधिक वाद टळला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.