टीम इंडियाचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात यूएसए विरुद्ध अपयशी ठरला. वैभवला यूएसए विरुद्ध दुहेरी आकडाही गाठता आला नव्हता. वैभव अवघ्या 2 धावांवर बाद झाला होता. मात्र वैभवने दुसऱ्याच सामन्यातून जोरदार कमॅबक करत धमाका केला आहे. वैभवने भारताच्या मोहिमेतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध झंझावाती अर्धशतकी खेळी केली. वैभवने या अर्धशतकासह भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याचा विक्रम मोडीत काढला. वैभवने विराटचा नक्की कोणता विक्रम मोडीत काढलाय हे जाणून घेऊयात.
वैभवने 13 व्या ओव्हरमधील सहाव्या बॉलवर (नो बॉल) एकेरी धाव घेतली. वैभवने यासह अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत 30 बॉलमध्ये पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं. वैभवने अर्धशतकानंतर फटकेबाजी करत भारताचा धावफलक धावता ठेवला. त्यामुळे वैभवला ही खेळी शतकात बदलण्याची संधी होती. मात्र वैभवची शतकाची संधी हुकली. वैभव शतकाच्या 28 धावांआधीच आऊट झाला. वैभवने 67 बॉलमध्ये 107.46 च्या स्ट्राईक रेटने 72 धावांची खेळी केली. वैभवने या खेळीत 3 सिक्स आणि 6 फोर लगावले.
वैभव सूर्यवंशी विराटला मागे टाकत लिस्ट ए क्रिकेटमधील यूथ वनडे फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. विराटने यूथ वनडेत 28 सामन्यांमध्ये 978 धावा केल्या होत्या. विराटने या दरम्यान एकूण 6 अर्धशतकं आणि 1 शतक झळकावलं होतं. मात्र आता वैभवने विराटला मागे टाकत नवा इतिहास घडवला आहे.
वैभवने बांगलादेश विरुद्ध 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. वैभवने यासह यूथ वनडे क्रिकेटमध्ये 1 हजार धावा पूर्ण केल्या. वैभवने अवघ्या 20 सामन्यांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली. तसेच वैभव विराटच्या तुलनेत शतकांबाबतही सरस आहे. वैभवने यूथ वनडेत 3 शतकं आणि 5 अर्धशतकं झळकावली आहेत. त्यामुळे वैभवने असाच झंझावात कायम ठेवत भारताला या स्पर्धेत वर्ल्ड कप ट्रॉफी मिळवून देण्यात योगदान द्यावं, अशीच इच्छा चाहत्यांना आहे.
दरम्यान भारताने आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात या स्पर्धेत विजयी सलामी दिली. भारताने स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात यूएसएला 107 धावांवर गुंडाळलं. मात्र भारताला पावसामुळे डीएलएसनुसार 37 ओव्हरमध्ये 96 धावांचं सुधारित आव्हान मिळालं. भारताने हे आव्हान 17.2 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं.