भारतीय महिला क्रिकेट संघ डब्ल्यूपीएल अर्थात वूमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात यजमान संघाविरुद्ध 15 फेब्रुवारी ते 6 मार्च दरम्यान एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहे. तसेच उभयसंघात एकमेव कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआय निवड समितीने टी 20i आणि एकदिवसीय या दोन्ही मालिकांसाठी शनिवारी 17 जानेवारीला भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. तर लवकरच एकमेव कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे.
टी 20i आणि एकदिवसीय मालिकेत प्रत्येकी 3-3 सामने खेळवण्यात येणार आहेत. उभयसंघात 15 ते 21 जानेवारी दरम्यान टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. त्यानंतर 24 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान एकदिवसीय मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय महिला संघात कुणाला संधी मिळालीय? हे जाणून घेऊयात.
हरमनप्रीत कौर हीच्याकडेच दोन्ही मालिकेतील कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर स्मृती मंधाना उपकर्णधार म्हणून हरमनप्रीतला नेहमीप्रमाणे सहकार्य करणार आहे.
बीसीसीआय निवड समितीने वैष्णवी शर्मा आणि जी कामलिनी या दोघींचा पहिल्यांदाच एकदिवसीय संघात समावेश केला आहे. या दोघांनी मायदेशात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून पदार्पण केलं होतं. तसेच काश्वी गौतम हीचं कमबॅक झालं आहे.
भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा
भारतीय महिला संघाला आतापर्यंत ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे यंदा हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवणार का? हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे.
पहिला सामना, 24 फेब्रुवारी, गाबा
दुसरा सामना, 27 फेब्रुवारी, होबार्ट
तिसरा सामना, 1 मार्च, होबार्ट
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी वुमन्स टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, रेणुका ठाकूर, श्रीचरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), जी कमलिनी (विकेटकीपर), काशवी गौतम, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रिग्स आणि हरलीन देओल.