जगात खळबळ ! डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा टाकला टॅरिफ बॉम्ब, 8 देशांवर लादला मोठा कर
GH News January 18, 2026 03:11 AM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला टॅरिफ धोरणाने हादरवून सोडले आहे.भारतावर देखील ट्रम्प यांनी ५० टक्क्यांहून अधिक टॅरिफ लावले आहे. आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफ बॉम्बचा धमाका केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी ग्रीनलँडच्या नियंत्रण करण्याच्या अमेरिकेच्या भूमिकेला विरोध करणाऱ्या आठ युरोपीय देशांना १० टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. जर हे देश बधले नाही तर १ जूननंतर हा टॅरिफ २५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येईल असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अमेरिका ग्रीनलँडचा ताबा घेण्यासाठी वेगाने पावले उचलत आहे. काही देशांनी या ग्रीनलँडवरील अमेरिकेच्या या दादागिरीचा विरोध केला आहे. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर उपाय शोधला आहे. युरोपातील एकूण आठ देशांवर हा टॅरिफ बॉम्ब फोडला आहे. ट्रम्प ग्रीनलँड मुद्द्यावर टॅरिफ धोरणांद्वारे दबाव वाढवण्याची खेळी खेळत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात युरोपसोबतचा अमेरिकेचा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

या आठ देशांना हादरा

डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपच्या आठ देशांवर टॅरिफची कुऱ्हाड चालविली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशल पोस्ट टाकत ही घोषणा केली आहे. त्यात त्यांनी १ फेब्रुवारीपासून डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, फिनलँड आणि ब्रिटेनमधून आयात होणाऱ्या सामानावर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला जाईल असे म्हटले आहे. त्यानंतर १ जूनपासून या टॅरिफमध्ये २५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येईल असेही त्यांनी म्हटले आहे.

युरोपशी संघर्ष

दुसरीकडे, युरोपीय देशांनी ग्रीनलँडमध्ये सैन्य तैनात केले आहे, त्याला ट्रम्प यांनी देशाच्या शाश्वत विकासाला बाधा आणणारे धोकादायक पाऊल असे म्हटले आहे. दरम्यान, डेन्मार्क आणि ग्रीनलँडमध्ये ट्रम्प यांच्या या निर्णयाविरुद्ध निदर्शने सुरू झाली आहे. ग्रीनलँडच्या जनतेने ग्रीनलँडचे भविष्य ठरवावे असा आग्रह धरला निदर्शकांनी धरला आहे. प्रमुख युरोपीयन युनियन देशांनी डेन्मार्कला पाठिंबा दर्शवित इशारा दिला आहे की जर अमेरिकेने नाटोमधील कोणत्याही भूभागावर लष्करी कब्जा केला तर तो युरोपियन युनियन देशांच्या संघटनेस मोठा धोका मानला जाईल. ब्रिटननेही डेन्मार्कला पाठिंबा दिला आहे. या वादामुळे अमेरिका आणि युरोपमधील तणाव वाढत आहे आणि भविष्यातील आंतरराष्ट्रीय संबंधांवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात असे म्हटले जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.