ठाकरे गटाच्या नगरसेवकाची श्रीकांत शिंदेंशी भेट
कल्याण, ता. १८ (वार्ताहर) : पालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे ११ नगरसेवक निवडून आले आहेत. यातील प्रभाग क्रमांक १३ मधून निवडून आलेले ठाकरे पक्षाचे नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी शुक्रवारी (ता. १६) खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत फोटो व्हायरल झाल्याने मधुर म्हात्रे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे.
पालिका निवडणुकीचा निकाल लागला असून सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिंदे गटाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच ठाकरे गटाचे ११, मनसेचे पाच, काँग्रेसचे दोन तर शरद पवार गटाचा एक नगरसेवक निवडून आला आहे. त्यामुळे शिंदे गट-भाजप या नगरसेवकांना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच मधुर म्हात्रे यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने विविध राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान, मधुर म्हात्रे हे याआधी शिंदे गटात कार्यरत होते; मात्र ऐन निवडणुकीत शिंदे गटाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी मशाल हाती घेत ठाकरे गटातून निवडणूक लढवली आणि विजयीदेखील झाले. त्यामुळे आता मधुर म्हात्रे यांच्या पुढील राजकीय निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले असून याबाबत त्यांना संपर्क केला असता संपर्क झाला नाही.