ग्रामपंचायत कार्यालयांना बायोमेट्रिक मशीन बसवण्याची मागणी
टोकावडे, ता. १९ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणालीची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वामन खाकर यांनी मुरबाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदवणे बंधनकारक करण्यात आली आहे. ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर माहिती फलक लावणे, कार्यालयीन वेळा व उपस्थितीचा तपशील दर्शवणेही अनिवार्य आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणी व नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींवरून तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये अद्याप बायोमेट्रिक मशीन नसल्याचे निदर्शनास आले. दोन वर्षांहून अधिक कालावधी उलटूनही त्याची अंमलबजावणी न होणे ही गंभीर बाब असल्याचे खाकर यांनी नमूद केले. ग्रामसेवकांची कार्यालयात वेळेवर उपस्थिती नसणे, विकास निधी वेळेत खर्च न होणे तसेच विविध ग्रामविकास कामांमध्ये होणारा विलंब यामुळे ग्रामीण विकासाला मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर मुरबाड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणाली तातडीने कार्यान्वित करावी, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.