कल्याण-डोंबिवलीत ‘मशाल’ पेटली
११ नगरसेवक विजयी; निष्ठावंत शिवसैनिक, मतदारांनी राखली ठाकरे गटाची प्रतिष्ठा
कल्याण, ता. १९ (वार्ताहर) : शिवसेना फुटीनंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणाचे पारडे जड ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, कोणत्याही बड्या प्रचाराशिवाय ठाकरे गटाने कल्याणमध्ये मुसंडी मारली आहे. कल्याण पश्चिम, पूर्व आणि आंबिवली भागातील मतदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेला साथ देत ११ जागांवर विजय मिळवून दिला आहे.
पालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना व शिंदेंची शिवसेना एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. या निवडणुकीसाठी ठाकरे गटाने नव्या चेहऱ्यांवर विश्वास ठेवत संधी दिली. ठाकरे गटाने मनसेशी युती करून जागावाटपाची बोलणी केली. ठाकरे गटाने ६५ जागा, तर मनसेने ५४ जागा घेतल्या. मात्र, प्रत्यक्षात ठाकरे गटाला केवळ ५४ ठिकाणी उमेदवार देता आले. यामध्ये कल्याण पश्चिमेकडील पॅनेल क्रमांक सहामध्ये शिंदे गटाच्या माजी महापौर वैजयंती घोलप यांचा पराभव ठाकरे गटाच्या अर्पणा भोईर यांनी केला, तर मनसेतून शिंदे गटात आलेल्या कस्तुरी देसाई यांचा पराभव ठाकरेंच्या शिलेदार स्वप्नाली केणे यांनी केला, तर उमेश बोरगावकर आणि संकेश भोईर यांनी शिवसेनेत दिग्गज असलेल्या माजी नगरसेवक संजय पाटील आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका निलिमा पाटील यांचा पराभव केला. पॅनल क्रमांक १० ब मधून उद्धव गटाचे विशाल गारवे यांनी शिंदे गटाचे माजी नगरसेवक विद्याधर भोईर यांचा पराभव केला.
आंबिवलीमधील पॅनेल क्रमांक ४ अ मधून ठाकरे गटाच्या तेजस्विनी गायकवाड यांनी शिंदेंच्या पूजा जोगदंड यांचा तर चार ब मधून राहुल कोट यांनी मयूर पाटील यांचा पराभव केला. कल्याण पूर्वेतील पॅनेल १३ अ मधून किर्ती ढोणे यांनी महादेव रायभोळे यांचा, तर १३ ड मधून मधुर म्हात्रे यांनी भाजपचे उपमहापौर विक्रम तरे यांचा पराभव केला. १५ अ मधून ॲड. वंदना महाले यांनी ज्योसना हुमणे यांचा पराभव केला. पॅनेल १६ अ मधून नीलेश खंबायत यांनी शिंदे सेनेच्या श्वेता जाधव यांचा पराभव केला.
२२ ठिकाणी थेट सामना
ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात २२ ठिकाणी थेट सामना झाला. २२ जागांवर ठाकरे गटाच्या उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली, तर भाजपविरोधात १२ ठिकाणी ठाकरे गटाने चुरशीची लढत देत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. ठाकरे गटाकडून उमेदवारांसाठी या प्रभागांमध्ये कोणत्याही बड्या नेत्यांच्या प्रचारसभा झाल्या नाहीत. तरीही कल्याण-डोंबिवलीकरांनी ११ जागांवर ठाकरे गटाला विजय मिळवून दिला.