जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुलंब्री तालुक्यातील काँग्रेस पक्षामध्ये मोठा स्फोट झाला आहे. तिकीट वाटप करताना निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करत संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज दुपारी खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या फुलंब्री येथील जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकारामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली असून निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची मोठी नामुष्की झाली आहे.
नेमका वाद काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पाल जिल्हा परिषद गटात माजी युवक काँग्रेस अध्यक्ष वरुण पाथ्रीकर यांना डावलून शेवटच्या क्षणी ध्न्यनेश्वर जाधव यांना तिकीट देण्यात आले. तसेच बाबरा गटात खामगाव येथील अजिबात सोनवणे यांना आश्वासन देऊनही ऐनवेळी डावलल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. निधोना पंचायत समिती गटातील उमेदवारीवरूनही कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप होता.
कार्यालयात गोंधळ अन् लोटालाट
दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शेकडो संतप्त कार्यकर्ते खासदारांच्या कार्यालयात जमा झाले. कार्यकर्त्यांनी केवळ घोषणाबाजीच केली नाही, तर कार्यालयातील फर्निचर, खुर्च्या आणि टेबलं यांची तोडफोड केली. यावेळी तिथे उपस्थित असलेले खासदारांचे बंधू जगन्नाथ काळे आणि तालुका काँग्रेस अध्यक्ष संतोष मेटे यांना कार्यकर्त्यांनी घेराव घातला. कार्यकर्त्यांनी त्यांना अर्धा तास जाण्यापासून रोखून धरले आणि लोटालाट करत जाब विचारला. “पैसे घेऊन तिकीट वाटप केले जात असून काँग्रेस संपवण्याचं काम सुरू आहे,” अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पदाधिकाऱ्यांमध्ये घबराट
कार्यकर्त्यांचे हे रौद्र रूप पाहून परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून शेजारील कार्यालयात बसलेले विश्वास औताडे तेथून निघून गेले या घटनेमुळे कार्यकर्त्यांमधील खदखद उघडपणे रस्त्यावर आली आहे. निवडणुका अवघ्या काही दिवसांवर असतानाच झालेली ही तोडफोड आणि आरोप काँग्रेस नेतृत्वासाठी मोठे आव्हान ठरणार असून, याचा मोठा फटका आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








