पावस, गावखडी गणात भाजपमध्ये धुसफूस
जागा शिंदे शिवसेनेच्या वाट्याला; नव्या चेहऱ्यांना संधी
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २१ ः गेली अनेक वर्ष भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पावस जिल्हा परिषद गटातील २ पंचायत समितीच्या जागा महायुतीच्या वाटपात शिंदे शिवसेनेला मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहेत. यंदाच्या निवडणुकीत ग्रामीण भागातील ठाकरे सेना आणि शिंदे शिवसेना अशी थेट लढत रंगणार असल्यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात शिंदे शिवसेनेपुढे आव्हान निर्माण झालेले आहे.
पावस जिल्हा परिषद गटात गावखडी आणि पावस असे दोन पंचायत समिती गणांचा समावेश आहे. यातील गावखडी गणातून भाजपचा उमेदवार पंचायती समितीवर निवडून जात होता. मागील निवडणुकीत रत्नागिरी तालुक्यातील भाजपच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पंचायत समितीमध्ये एकमेव सदस्य होता; परंतु आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर तालुक्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी जागावाटपात भाजपला वाटद आणि हरचिरी हे दोन गण देण्यात आले आहेत. हे दोन्ही गट भाजपच्या दोन तालुकाध्यक्षांचे वर्चस्व असलेले आहेत; मात्र पारंपरिक गणाची जागा शिंदे शिवसेनेला सोडण्यात आल्यामुळे सध्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. त्यात महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला समाविष्ट करून न घेतल्यामुळे येथील कार्यकर्ते नाराज आहेत. त्यात भाजपच्या कार्यकर्त्यांची भर पडली आहे. त्यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान भाजप श्रेष्ठींसह शिंदे शिवसेनेच्या नेत्यांपुढे आहे.
दरम्यान, पावस पंचायत समिती गणातून ठाकरे शिवसेनेकडून जुन्या कार्यकर्त्याला संधी दिली गेली असून, गावखडी पंचायत समिती गणातून शिवार आंबेरे येथील नवख्या उमेदवाराला ठाकरे सेनेने संधी दिली आहे. शिंदे शिवसेनेकडूनही दोन्ही जागांवर नवख्या उमेदवारांना संधी दिली आहे.
कोट
आजपर्यंत पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत आहोत. मधल्या काळात अनेक वादळे निर्माण झाली. त्यात काही पडझडी झाल्या तरीही आम्ही पुन्हा रिंगणामध्ये उभे राहून पक्षाचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. या निवडणुकीमध्ये आम्ही आमची ताकद दाखवून देऊ.
- समिधा भाटकर, महिला आघाडी प्रमुख, ठाकरे शिवसेना
कोट २
पक्षाच्या व पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार, आम्ही महायुतीच्या प्रचारात सामील होणार असून, महायुतीच्या माध्यमातून पक्षांनी दिलेल्या उमेदवारांची आघाडी मोठ्या प्रमाणात घेऊ. त्यासाठी ताकद पणाला लावू.
- विजय चव्हाण, विभागप्रमुख, पावस शिंदे शिवसेना
कोट ३
मागील पंचायत समिती निवडणुकीमध्ये दोन जागा असल्यामुळे या वेळी तालुक्यामध्ये दोन जागा महायुतीमध्ये देण्यात आल्या आहेत. त्यावरती कार्यकर्त्यांचे समाधान होत नसल्याने कार्यकर्ते नाराज आहेत; परंतु पक्षाचा आदेश महायुतीमध्ये काम करण्याचा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
- संतोष सुर्वे, कार्यकर्ते, भाजप