नसरापूर, ता. २१ :‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या दुसरा टप्पा भोर तालुक्यातील कापूरव्होळ-कासुर्डी ते दिडघर करंजावणे असा पार पडला. कापूव्होळ येथे शालेय मुलांनी तसेच नागरिकांनी पारंपरिक वेशात व ढोल-ताशांच्या गजरात सायकलपट्टुंचे स्वागत केले. प्रशासनाच्या चोख व्यवस्थेमुळे या अंतरात कोठेही व्यत्यय न येता स्पर्धा पार पडली.
स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भोर तालुक्यातील दिवळे, कापूरव्होळ येथे स्पर्धकांचे प्रशासनाने व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. रंगीबेरंगी पोशाखात नटलेली शाळकरी मुले, ग्रामस्थांनी घातलेले पारंपरिक पोशाख ग्रामीण वाद्य ढोल-ताशा वाजवत भर उन्हात उत्साहात स्वागत केले. वेलकम इंडिया व टाळ्यांच्या घोषात मुलांनी स्पर्धकांना प्रोत्साहित केले. स्पर्धेच्या पूर्व तयारीसाठी व ग्रामस्थांच्या सहकार्यासाठी प्रशासनाने स्पर्धा मार्गावरील गावच्या ग्रामस्थांसमवेत बैठका घेऊन या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार सर्वच गावांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहकार्य केले. प्रत्यक्ष स्पर्धेच्या दिवशी सकाळी भोरचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन, पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी संपूर्ण स्पर्धा मार्गावर फेरी मारून सर्व व्यवस्थेची पाहणी केली. तालुक्याच्या सीमेवर दिवळे येथे प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. या ठिकाणी नायब तहसीलदार अरुण कदम व महसूल कर्मचारी उपस्थित होते. कापूरव्होळ येथे भोर फाट्यावर ग्रामपंचायत ग्रामस्थ कापूव्होळच्या वतीने स्वागत करण्यात आले. या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने पगडी व मावळ्यांचा पोशाख केलेल्या पथकाने ढोल-लेझीमच्या तालावर नृत्यकरीत स्वागत केले. ग्रामपंचायतीच्या सर्व उपस्थितांना फेटे बांधण्यात आले होते.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
कापूरव्होळ पासून कासुर्डी, मोहरी, हातवे, दिडघर, कुरंगवडी फाटा, घोरेपडळ या सर्व गावांच्या ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उभे राहून टाळ्या वाजवत सायकल स्पर्धकांचे स्वागत केले. सर्व रस्त्यावर पोलिस तैनात करण्यात आले होते. एक उपविभागीय पोलिस अधिकारी, पाच पोलिस निरीक्षक व ७०० पोलिस कर्मचारी स्पर्धेच्या सर्व मार्गावर बंदोबस्त करत होते.
06134