IND vs NZ : टीम इंडियाला विजयानंतरही मोठा झटका, नक्की काय झालं?
GH News January 22, 2026 07:10 AM

भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड विरुद्ध जबरदस्त कामगिरी करत पहिला टी 20i सामना हा 48 धावांनी जिंकला. उभयसंघातील पहिल्या सामन्याचं आयोजन हे नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. न्यूझीलंडला भारताने विजयसाठी दिलेल्या 239 धावांचा पाठलाग करताना 20 ओव्हरमध्ये 190 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताने हा सामना 48 धावांनी जिंकत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली. मात्र या विजयानंतरही भारताला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियासोबत नक्की काय झालं? हे जाणून घेऊयात.

उपकर्णधार अक्षर पटेल याला दुखापत

भारताचा उपकर्णधार अक्षर पटेल याला या पहिल्या सामन्यादरम्यान दुखापत झाली. अक्षरच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे अक्षरवर मैदान सोडण्याची वेळ आली. अक्षरला नक्की काय झालं? याबाबत समजून घेऊयात.

अक्षरला सामन्यातील दुसऱ्या डावात न्यूझीलंड विरूद्धच्या बॅटिंग दरम्यान ही दुखापत झाली. अक्षरने ग्लेन फिलिप्स याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवत न्यूझीलंडला मोठा झटका दिला. मात्र त्यानंतर अक्षरलाच दुखापत झाली. अक्षरने त्याच्याच बॉलिंगवर डॅरेल मिचेल याने मारलेला फटका रोखण्याचा प्रयत्न केला. अक्षरच्या बोटाला या प्रयत्नात जोरात फटका बसला. हा सर्व प्रकार 15 व्या ओव्हरदरम्यान झाला.

अक्षरला बॉल अडवताना त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीच्या टोकाला जोरदार फटका बसला. हा फटका इतका जोरात बसला की अक्षरच्या तर्जनीतून रक्त येऊ लागलं. त्यामुळे अक्षरला मैदानाबाहेर नेण्यात आलं. फिजिओकडून अक्षरची तपासणी करण्यात आली. मात्र अक्षरला त्यानंतर मैदानात परतता आलं नाही. त्यामुळे अभिषेक शर्मा याने अक्षरच्या ओव्हरमधील उर्वरित चेंडू टाकले.

टीम इंडियाला टेन्शन

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला आता मोजून काही दिवस बाकी आहेत. अशात अक्षरच्या दुखापतीमुळे टीम मॅनेजमेंटचं टेन्शन वाढलं आहे. अक्षर उत्तर फलंदाज आणि गोलंदाजही आहे. तसेच तो उपकर्णधारही आहे, हे विसरुन चालणार नाही. त्यामुळे आता अक्षर या दुखापतीमुळे दुसऱ्या टी 20i सामन्यासाठी उपलब्ध असणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दुसरा टी 20I सामना कुठे?

दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी 20I सामना हा शुक्रवारी 23 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.