सावंतवाडीत सोमवारी देशभक्तिपर कार्यक्रम
esakal January 23, 2026 06:45 AM

सावंतवाडीत सोमवारी
देशभक्तिपर कार्यक्रम
सावंतवाडीः येथील सर्वोदयनगर रहिवासी संघातर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सोमवारी (ता. २६) सायंकाळी ६.३० वाजता विशेष प्रजासत्ताक दिन स्नेहसंमेलन व नवनिर्वाचित नगराध्यक्षा व प्रभागातील नगरसेवक, नगरसेविका यांचा स्नेहसत्कार समारंभ आयोजित केला आहे. नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांची प्रमुख उपस्थित आहे. रहिवासी संघाचे अध्यक्ष सुनील राऊळ, महिलाध्यक्षा दिशा कामत, उपाध्यक्ष तथा नगरसेवक अजय गोंदावळे, नगरसेविका सुकन्या टोपले, प्रा. गणपत शिरोडकर, संघाचे सदस्य गुरुदत्त कामत उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त देशभक्तिपर सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ६.३० वाजता दीपप्रज्वलन व प्रजासत्ताक दिन अभिवादनाने होईल. सायंकाळी ७ ते ८ या वेळेत प्रजासत्ताक दिन, वेशभूषा, वक्तृत्व स्पर्धा, रात्री ८ वाजता सांस्कृतिक कला-गुणांचे सादरीकरण, ९ वाजता स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे. संमेलन सर्वोदयनगर गार्डन, भारत गॅस गोडावून नजीक होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक अध्यक्ष सुनील राऊळ, उपाध्यक्ष नगरसेवक अजय गोंदावळे, सचिव मेघना राऊळ, महिला अध्यक्षा दिशा कामत, महिला सचिव शरयू बार्देस्कर व सर्वोदयनगर रहिवासी संघाने केले आहे.
.....................
सावंतवाडी येथे निवडणूक
संनियंत्रण समिती स्थापन
सावंतवाडी ः जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व अंकुश ठेवण्यासाठी सावंतवाडी तालुकास्तरावर निवडणूक संनियंत्रण समिती स्थापन केली आहे. समितीचे अध्यक्ष सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील असून सदस्यपदी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, समिती सचिव नायब तहसीलदार व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांचा समितीत समावेश आहे.
......................
मालवणात फेब्रुवारीत
‘प्रकट दिन’ सोहळा
मालवण ः शहरात गजानन महाराज (शेगाव) यांच्या प्रकट दिनानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा सोहळा ८ फेब्रुवारीला मालवण बसस्थानकानजीक असलेल्या श्रीराम मंदिरात साजरा होणार आहे. सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत गजानन विजय ग्रंथाचे साखळी पारायण, ८ वाजता गजानन महाराजांची महापूजा, दुपारी १२ वाजता महाआरती व नैवेद्य, दुपारी १ ते ३ पर्यंत झुणका-भाकरी प्रसादाचे वाटप, सायंकाळी ५ वाजता भक्ती संगीत कार्यक्रम ''स्वरसंध्या'' होणार असून प्रसिद्ध गायक अॅड. दिलीप ठाकूर (संगीत अलंकार) सादर करणार आहेत. सायंकाळी ७ वाजता गजानन महाराजांचा प्रकट दिन देखावा, ७.३० वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळाचा ''कृष्ण-सुदाम भेट'' हा नाट्यप्रयोग रंगणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन गजानन महाराज (शेगाव) भक्त मंडळ, मालवणने केले आहे.
........................
कणकवलीत उद्या
''डबलबारी भजन''
कणकवली ः देव ढालकाठी मंदिरात शनिवारी (ता. २४) त्रैवार्षिक महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी अभिषेक, सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ४ वाजता हौशी आरती मंडळांचा आरती गायन कार्यक्रम, ५.३० वाजता रवळनाथ भजन मंडळाचे (बुवा लक्ष्मण बागवे) भजन, ६.३० वाजता गायक भूषण गोसावी, गायिका सलोनी मेस्त्री यांचा ''संगीतसंध्या'' कार्यक्रम, संगीत साथ संदीप पेंडूरकर, मयुर मेस्त्री, विराज राणे यांची आहे. रात्री ८ वाजता भालचंद्र भजन मंडळ, हळवल (बुवा मंदार मेस्त्री) यांचे भजन, ९ वाजता देव रवळनाथ काळकाई भजन मंडळाचे बुवा सुदेश कुडतरकर व रामेश्वर भजन मंडळ, भिरवंडेचे बुवा सतीश सावंत यांचा डबलबारी भजन सामना होणार आहे. कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
..........................
कोलगावात आजपासून
सीएसडी कॅन्टीन सेवा
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजी-माजी सैनिकासाठीची सीएसडी कॅन्टीन सेवा कोरोना काळापासून बंद झाली होती, ती अद्यापही सुरू झाली नव्हती. आता पुन्हा एकदा १०९ इन्फट्री बटालियन टीए मराठा लाईट इन्फटी, कोल्हापूर यांच्याकडून जिल्ह्यात मंजूर झाली आहे. जिल्ह्यातील जवळपास दहा हजारांहून अधिक आजी-माजी सैनिकांना लाभ होणार आहे. बिग्रेडियर सुधीर सावंत यांनी २० वर्षांपूर्वी सिंधुदुर्गात कॅन्टीन सेवा सुरू केली होती. ही सेवा सावंतवाडी येथे सुरू करण्यात आली होती. त्यानंतर कुडाळ येथे या कॅन्टीनचा प्रारंभ झाला होता. कोरोनाकाळात पाच-सहा वर्षांपूर्वी येथील सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर अनेक माजी सैनिक व संघटनांनी कॅन्टीन पूर्ववत सुरू व्हावे, यासाठी मागणी केली होती. पालकमंत्री नीतेश राणे यांचेही लक्ष वेधले होते. त्यानंतर ही सेवा मंजूर झाली आहे. सैनिक नागरी सहकारी पतसंस्था, कोलगाव शाखा येथे या सेवेचा प्रारंभ उद्या (ता. २३) सकाळी ९.३० वाजता होणार आहे. या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सैनिक कल्याण कार्यालय व सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर यांनी केले आहे.
...........................

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.