नळ कनेक्शन रक्कम देण्यास टाळाटाळ
देवरुखातील प्रकार ; कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. २२ ः देवरूख नगरपंचायत कार्यालयातील पाणी विभागातील एका कर्मचाऱ्याने नळ कनेक्शनची रक्कम सात वर्षाचा कालावधी उलटूनदेखील अमित जाधव यांना परत दिलेली नाही. संबंधित कर्मचाऱ्याच्या विरोधात जाधव यांनी नगराध्यक्ष मृणाल शेट्ये यांच्याकडे तक्रारअर्ज सादर केला आहे.
जाधव यांचे देवरूख बसस्टॅण्डवर कॅन्टीन होते. २०१८ मध्ये दोन नळ कनेक्शनसाठी देवरूख नगर पंचायत कर्मचाऱ्याकडे १० हजार रुपये रक्कम जमा करण्यात आली होती. पाच हजारांची पावती कर्मचाऱ्याने जाधव यांना दिली. कॅन्टीन परवाना रद्द झाल्याने जाधव यांनी नळ कनेक्शन घेतले नाही. कनेक्शनसाठी भरलेली रक्कम परत मिळावी यासाठी जाधव सात वर्षे प्रयत्न करत आहेत. तत्कालीन मुख्याधिकारी चेतन विसपुते यांच्याकडे व्यथा मांडली होती. संबंधित कर्मचाऱ्याने आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. या संदर्भात जाधव यांनी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांच्याकडे तक्रारअर्ज दाखल करत आपली कैफियत मांडली आहे. शहरवासियांचे यावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षा शेट्ये यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित कर्मचाऱ्याच्या विरोधात अनेक तक्रारी येत आहेत. कोणत्याही कर्मचाऱ्याने आर्थिक गैरव्यवहार केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही. सखोल चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
---