न्यूझीलंड क्रिकेट टीमने रायपूरमध्ये भारतासमोर दुसर्या टी 20i सामन्यात 200 पार मजल मारली आहे. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 209 धावांचं तगडं आव्हान दिलं आहे. न्यूझीलंडने 6 विकेट्स गमावून 208 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी मिडल ऑर्डरमध्ये रचीन रवींद्र याने 44 धावांची खेळी केली. तर कर्णधार मिचेल सँटनर याने अखेरच्या क्षणी फटकेबाजी केली. सँटनर याने न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. सँटनरने नाबाद 47 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला 200 पार पोहचता आलं. सँटनरने दिलेल्या फिनिशिंग टचमुळे न्यूझीलंडला भारतासमोर 209 धावांचं हे आव्हान ठेवता आलंय. आता टीम इंडिया हे आव्हान पूर्ण करत नागपूरनंतर रायपूरमध्ये विजयी होत सलग दुसरा सामना जिंकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. डेव्हॉन कॉनव्हे आणि टीम सायफर्ट या सलामी जोडीने न्यूझीलंडला आक्रमक सुरुवात करुन दिली. या दोघांनी स्फोटक बॅटिंग करत न्यूझीलंडला 43 धावांपर्यंत पोहचवलं. मात्र त्यानंतर भारताने न्यूझीलंडला सलग 2 षटकांत झटके देत जोरदार कमबॅक केलं. हर्षित राणा याने डेव्हॉन कॉनव्हे याला आऊट केलं आणि ही जोडी फोडली. हर्षितची कॉनव्हेला आऊट करण्याची ही चौथी वेळ ठरली. कॉनव्हेने 19 धावा केल्या. तर वरुण चक्रवर्ती याने टीम सायफर्ट याला 24 धावांवर इशान किशन याच्या हाती कॅच आऊट केलं. त्यामुळे न्यूझीलंडची 43-0 वरुन 43-2 अशी स्थिती झाली.