राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आधी नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांमध्ये राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला, दरम्यान महापालिका निवडणुका झाल्यानंतर आता महापौरपदांसाठी सोडत जाहीर झाली असून, आपलाच महापौर महापलिकेत बसावा, यासाठी प्रत्येक पक्ष संख्याबळाचं गणित जुळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे त्यानंतर निवडणूक आयोगाकडून राज्यता जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या पाच फेब्रुवारी रोजी राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे, आता त्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे जालना जिल्ह्यातल्या जवळपास 475 ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात संपत आहे, मात्र याच कालावधीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होणार असल्यानं आणि परीक्षांचा हंगाम पाहता या ग्रामपंचायतींच्या निवडणुका चार महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या गावांचा कारभार आता प्रशासकांच्या हाती जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. फेब्रुवारी महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक मोठ्या लोकसंख्येच्या गावांचा समावेश आहे, त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी निवडणुका होणे अपेक्षित आहे, मात्र याच निवडणुकीच्या काळात दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्यामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांना आता प्रतिक्ष करावी लागू शकते.
राज्यात निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून, जोरदार तयारी सुरू आहे. मात्र या निवडणुकीचा फटका आता ग्रामपंचायत निवडणुकीला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.