जल्लोष करा पण, जरा जपून
esakal January 24, 2026 10:45 AM

पिंपरी, ता. २३ : सण, उत्सव, विजयी मिरवणुका, विजयाचा जल्लोष किंवा सार्वजनिक कार्यक्रम हे आनंद साजरा करण्याचे क्षण असतात. मात्र, अलीकडच्या काळात या जल्लोषाला अपघातांचे गालबोट लागत असल्याचे चित्र दिसत आहे. आतषबाजी, गुलाल व भंडाऱ्याची उधळण, प्रचंड गर्दी आणि मद्यप्राशन यामुळे अनेक ठिकाणी किरकोळ ते गंभीर दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे आनंद साजरा करताना जरा जपून व जबाबदारीने वागणे गरजेचे बनले आहे.
सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडणे, अरुंद रस्त्यांवर किंवा इमारतींच्या जवळ आतषबाजी करणे धोकादायक ठरत आहे. फटाक्यांचे तुकडे अंगावर पडून भाजणे, आगीचे लोळ उठणे, वाहनांना आग लागणे, अशा घटना समोर येत आहेत. लहान मुलांच्या हातात फटाके दिल्याने गंभीर जखमा होण्याचे प्रमाणही वाढले आहे. ध्वनी प्रदूषणामुळे वृद्ध, आजारी नागरिक, लहान मुले तसेच प्राण्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच, उत्सवात मोठ्या प्रमाणावर गुलाल व रंगांची उधळण केली जाते. मात्र, बाजारात मिळणाऱ्या काही रंगांमध्ये रासायनिक घटक असल्याने त्वचारोग, डोळ्यांची जळजळ, श्वसनाचा त्रास अशा समस्या उद्भवतात.

गर्दी आणि चेंगराचेंगरीचा धोका
मिरवणुका, शोभायात्रा किंवा सार्वजनिक कार्यक्रमांत प्रचंड गर्दी होत असल्याने चेंगराचेंगरीचा धोका निर्माण होतो. विशेषतः अरुंद रस्ते, चौक किंवा बंदिस्त जागांमध्ये गर्दी वाढल्यास परिस्थिती क्षणात नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता असते. काही ठिकाणी मद्यप्राशन करून जल्लोष करणाऱ्यांमुळे वाद, भांडणे आणि गोंधळ निर्माण होऊन अपघात घडल्याचेही आढळले आहे.
दरम्यान, आनंद साजरा करणे ही आपली संस्कृती आहे; मात्र तो करताना स्वतःची, इतरांची आणि पर्यावरणाची सुरक्षितता जपणे तितकेच महत्त्वाचे आहे. थोडी सावधगिरी आणि शिस्त पाळली, तर जल्लोष खऱ्या अर्थाने सुरक्षित, आनंददायी आणि अविस्मरणीय ठरेल.

काय काळजी घ्यावी?
- सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी आतषबाजी करू नये
- लहान मुलांना फटाके हाताळू देऊ नयेत; आवश्यक असल्यास प्रौढांच्या देखरेखीखालीच फटाके फोडावेत
- गर्दीत संयम पाळून शिस्तीत सहभाग घ्यावा; धक्काबुक्की टाळावी
- मद्यप्राशन करून जल्लोष करणे टाळावे
- आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ वैद्यकीय सेवा व पोलिसांची मदत घ्यावी
- पर्यावरणपूरक, नैसर्गिक रंगांचा व गुलालाचा वापर करावा
- डोळे, नाक व तोंड संरक्षित ठेवण्यासाठी चष्मा किंवा मास्कचा वापर करावा

घडलेल्या घटना
- २१ डिसेंबर ः जेजुरीत नगरपरिषद निवडणूक निकालानंतर आतषबाजी व भंडाऱ्याची उधळण सुरू होती. त्यावेळी आगीचा भडका उडून विजयी उमेदवारासह काहीजण जखमी झाले.
- ११ जानेवारी ः महापालिका निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भोसरीतील दिघी रस्त्यावर ‘रोड शो’ आयोजित केला असता या ‘रोड शो’ दरम्यान आतषबाजीमुळे रस्त्यालगतच्या पाच मजली इमारतीच्या छतावर आग लागली.
- १६ जानेवारी ः बावधनमधील पाटीलनगर येथे उमेदवाराच्या विजयोत्सवात गुलाल उधळला जात असताना फटाक्याची ठिणगी पडून आगीचा भडका उडाला. यामुळे सातजण भाजून किरकोळ जखमी झाले.
---

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.