सावर्डे महाविद्यालयात
मोफत दंत तपासणी
सावर्डे ः खेड येथील योगिता दंत महाविद्यालयातर्फे ‘राष्ट्रीय युवा दिनानिमित्त’ सावर्डेच्या कला व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. सामाजिक दंतशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संयुक्त विद्यमाने दंत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित केले होते. दातांच्या आरोग्याबाबत विद्यार्थ्यांना दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या डॉ. मुग्धा खोंड यांनी मार्गदर्शन केले. या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमांगी पोळ, सामाजिक दंतशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुप्रिया व्यवहारे, मुखरोग निदान व क्ष-किरण विभागप्रमुख डॉ. आदित्य दुपारे आदी उपस्थित होते.
-------
सायबर गुन्ह्याविषयी
कडवईत मार्गदर्शन
संगमेश्वर ः तालुक्यातील कडवई येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शाखा प्रबंधक सुदाम पाटमास यांनी ग्राहकांना सायबर गुन्हेगारी या विषयावर मार्गदर्शन केले. ग्राहकांनी न घाबरता दक्ष राहण्याचे आवाहन केले. बँक ऑफ इंडिया कडवई शाखेचे शाखा प्रबंधक सुदाम पाटमास यांनी ग्राहकांची एक बैठक घेत ग्राहकांना सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक या विषयावर मार्गदर्शन केले. कायदा अंमलबजवणी संस्था कधीही फोन, व्हॉटस्अॅप किंवा व्हिडिओ कॉलवर पैसे मागत नसतात. त्यामुळे अशा प्रकारचे कॉल आल्यास घाबरून जाऊ नये. आपली कोणतीही वैयक्तिक माहिती कुणाला शेअर करू नका. कोणतीही अडचण वाटल्यास नजीकच्या बँकेच्या शाखेत येऊन त्याची माहिती घ्या. घाबरून न जाता दक्ष राहून अशा घोटाळ्यापासून आपला बचाव करा, असे आवाहन शाखाप्रबंधक सुदाम पाटमास यांनी केले.
-------
राष्ट्रीय मतदार
दिनानिमित्त प्रतिज्ञा
पावस ः मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार, राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज मतदारांसाठीची प्रतिज्ञा घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते. नायब तहसीलदार दीपक चव्हाण यांनी ही प्रतिज्ञा उपस्थितांना दिली. आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून या द्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू, अशी प्रतिज्ञा करण्यात आली. उपजिल्हाधिकारी (रोहया) हर्षलता गेडाम यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.