रत्नागिरी- एमआयडीसीचा सक्रिय पाठिंबा
esakal January 24, 2026 10:45 AM

महाराष्ट्र पर्यटन, एमआयडीसीचा
सागर महोत्सवाला सक्रिय पाठिंबा
रत्नागिरी, ता. २३ : सागर संवर्धन, पर्यावरणीय समतोल आणि महासागर परिसंस्थेचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने आयोजित चौथ्या सागर महोत्सवाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी सक्रिय पाठिंबा बहुमूल्य सहकार्य केले. अशा उपक्रमांमुळे सागरी पर्यटनाला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, पर्यावरणाविषयी जनजागृती अधिक व्यापक होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
महोत्सवाच्या चार दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्र पर्यटन विभाग अधिकारी व प्रतिनिधी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. त्यांच्या सहभागामुळे शासनाच्या धोरणात्मक भूमिका, सागरी पर्यटन विकासाच्या योजना, उद्योग व पर्यटनक्षेत्रातील समन्वय याबाबत उपस्थित नागरिकांना थेट माहिती मिळाली.
पर्यटन विभागाच्या स्टॉलला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. महोत्सवाला भेट देणारे पर्यटक, विद्यार्थी, संशोधक, स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी स्टॉलला भेट देत राज्यशासनाच्या विविध पर्यटन योजना, सागरी पर्यटनासाठी उपलब्ध सुविधा, भविष्यातील प्रकल्प, पर्यावरणपूरक आणि शाश्वत पर्यटन संकल्पनांची माहिती घेतली. अनेकांनी पर्यटन विभागाच्या उपक्रमांबाबत विशेष उत्सुकता दाखवत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला.
शासन यंत्रणा, तज्ज्ञ, अभ्यासक आणि सामान्य नागरिक यांच्यात संवाद साधण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सागर महोत्सवाच्या माध्यमातून घडले असून, भविष्यातही अशा आशयपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्यात यावे, अशी अपेक्षा आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी व्यक्त केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.