पवारांचा बालेकिल्ला भाजप ‘फत्ते’ करणार का?
कुडाळ गटात शिवेंद्रसिंहराजेंच्या समर्थकांनी कसली कंबर; मूळ ओबीसींमध्ये धुसफूस
प्रशांत गुजर : सकाळ वृत्तसेवा
आनेवाडी, ता. २४ ः जावळी तालुक्यातील प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या कुडाळ जिल्हा परिषद गटात पुन्हा एकदा राजकीय संघर्षाचा धुरळा उडणार आहे. गेल्या १५ वर्षांपासून हा गट दीपक पवार यांचा अभेद्य बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, यंदा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपने हा गड काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. ऐनवेळी बदललेली समीकरणे, अंतर्गत नाराजी आणि ओबीसी मतांचे ध्रुवीकरण यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.
दीपक पवारांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने तालुक्यात एकीची मूठ बांधली आहे. मात्र, उमेदवारी वाटपाच्या अंतिम टप्प्यात मध्यरात्री जे बदल झाले, त्याने अनेकांना धक्का बसला आहे. कुडाळ जिल्हा परिषद ओबीसी (महिला) जागेसाठी भाजपने महिगावच्या जयश्री गिरी यांना मैदानात उतरवले आहे, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून कुडाळच्या पूनम नायकुडे यांचे आव्हान आहे. असे असले, तरी मूळ ओबीसी समाजातील अनेक इच्छुकांना डावलल्याने अंतर्गत धुसफूस वाढली आहे. जर नाराज झालेल्या माधुरी गोरे, जयश्री शेवते, प्रसन्ना रासकर यांसारख्या उमेदवारांनी एकत्र येत तिसरा पर्याय दिला, तर भाजपची वाट बिकट होऊ शकते.
सायगाव पंचायत समिती गणात भाजपने आनेवाडीच्या चारुशीला पवार यांना उमेदवारी देऊन धक्कातंत्र वापरले आहे. येथे राष्ट्रवादीच्या साक्षी देशमुख त्यांच्याशी दोन हात करतील. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत खर्शी (तर्फे कुडाळ) येथील अश्विनी मुळीक किंवा वंदना भोसले यांचे नाव निश्चित मानले जात होते. ऐन वेळी नाव कापले गेल्याने खर्शी विभागात मोठी नाराजी आहे. अनेक वर्षे संधीची वाट पाहणाऱ्या या भागातील मतदारांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर असेल. त्यातच आरपीआय आणि अपक्षांच्या उड्यांमुळे मतांच्या विभाजनाचा धोका वाढला आहे.
कुडाळ पंचायत समिती गणात भाजपने सौरभ शिंदे यांना संधी दिली आहे. एकेकाळचे कट्टर प्रतिस्पर्धी सुहास गिरी आणि सौरभ शिंदे यांच्यात झालेली ‘दिलजमाई’ भाजपसाठी जमेची बाजू मानली जात आहे. मात्र, राजेंद्र शिंदे (राष्ट्रवादी), सोमनाथ कदम (शिवसेना) आणि धनंजय केंजळे यांच्यासारख्या तगड्या उमेदवारांमुळे ही लढत एकतर्फी राहिलेली नाही. सौरभ शिंदे यांना स्वतःच्या गावातून होणारा विरोध कितपत निवळतो, यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. मेढा विभागातील ११ गावे सायगाव गणात येतात. या भागातील नेत्यांनी वारंवार डावलले जात असल्याची तक्रार करत शिवेंद्रसिंहराजेंकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, तिथेही स्थानिक नेत्यांचा विचार न झाल्याने ही ‘एकी’ आता कोणाच्या पारड्यात वजन टाकणार, याकडे संपूर्ण जावळीचे लक्ष लागले आहे.
विकासकामे की बालेकिल्ल्याची निष्ठा?
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कुडाळ भागात केलेली विकासकामे आणि त्यांची मजबूत कार्यकर्त्यांची फळी ही भाजपची मोठी ताकद आहे. विस्कळित झालेला भाजपचा गट आता एकत्र आला असला, तरी दीपक पवारांचे या गटावरील वैयक्तिक वर्चस्व कमी करणे सोपे नाही. ओबीसी समाजाला डावलल्याची भावना आणि शेवटच्या क्षणी बदललेले उमेदवार यामुळे राजकीय जाणकारांच्या मते, ‘विजय कोणाचाही झाला तरी तो अत्यंत अटीतटीचा असेल.’
कुडाळच्या या ‘महाभारतात’ बालेकिल्ल्याची तटबंदी टिकते की सत्तेचा झंझावात नवा इतिहास रचतो, हे लवकरच स्पष्ट होईल.
फोटो ओळ :
कुडाळ जिल्हा परिषद गट उमेदवार – जयश्री गिरी, पूनम नायकुडे, माधुरी गोरे, स्वप्नाली ननावरे
सायगाव गण उमेदवार – चारुशीला पवार, साक्षी देशमुख, वंदना भोसले
कुडाळ गण – सौरभ शिंदे, राजेंद्र शिंदे, सोमनाथ कदम, प्रशांत तरडे