मनसेतर्फे ज्येष्ठ नागरिकांना मोफत आधार काठीचे वाटप
घाटकोपर, ता. २४ (बातमीदार) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रभाग क्रमांक १३३च्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. बुधवारी (ता. २३) सकाळी ११ वाजता मनसे शाखेत विभागातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत आधार काठीचे वाटप करण्यात आले. मनसेचे अविनाश कदम यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. वयोमानामुळे चालण्यात अडचणी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आधार मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या उपक्रमाला विभागातील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी आधार काठीचा लाभ घेतला. मनसेतर्फे सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल उपस्थित नागरिकांनी आनंद व्यक्त केला.