टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20i मालिकेत सलग 2 सामने जिंकत नववर्षाची जबरदस्त सुरुवात केलीय. भारताने या सलग 2 विजयांसह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे. आता उभयसंघातील तिसरा सामना हा गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना रविवार 25 जानेवारीला होणार आहे. भारताला हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. टीम इंडिया या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. तिसऱ्या सामन्यासाठी एकूण 2 बदल अपेक्षित आहेत. टीम मॅनेजमेंट नक्की कोणत्या दोघांना प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवू शकते? हे जाणून घेऊयात.
गुवाहाटीत वेगवान गोलंदाज हर्षित राणा याच्यासह प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकूण 2 बदल केले जाऊ शकतात. हर्षितला पहिल्या सामन्यात संधी मिळाली नव्हती. मात्र हर्षितला दुसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या जागी संधी देण्यात आली होती. बुमराहला रायपूरमधील सामन्यात विश्रांती देण्यात आल्याने हर्षितचा प्लेइंग ईलेव्हनध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र आता बुमराहचं कमबॅक झाल्यास हर्षितला बाहेर व्हावं लागेल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
दुसरा खेळाडू कोण?भारताने दुसऱ्या सामन्यासाठी 2 बदल केले होते. बुमराह व्यतिरिक्त अक्षर पटेल याला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं होतं. त्यामुळे अक्षरच्या जागी कुलदीप याचा समावेश करण्यात आला होता. अशात आता अक्षरचा समावेश झाल्यास कुलदीपला बेंचवर बसावं लागू शकतं. मात्र बीसीसीआयकडून अक्षरच्या दुखापतीबाबत कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. अक्षरला नागपूरमध्ये पहिल्याच सामन्यात बॉलिंग करताना बोटाला दुखापत झाली होती. अक्षरला बॉल अडवताना बोटाला फटका बसला होता. त्यामुळे अक्षरच्या बोटातून रक्त वाहू लागलेलं. त्यामुळे अक्षरला दुसऱ्या सामन्याला मुकावं लागलं.
कुलदीपने रायपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या टी 20i सामन्यात न्यूझीलंडच्या 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला होता. तर हर्षितने 1 विकेट मिळवली होती. मात्र आता टीम मॅनेजमेंटचा प्लेइंग ईलेव्हनबाबत अंतिम निर्णय काय आहे? हे टॉसनंतर स्पष्ट होईल.
तिसऱ्या टी 20I साठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, शिवम दुबे, अक्षर पटेल/कुलदीप यादव, हर्षित राणा/जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती.