लग्नाआधी रंगेहाथ पकडलं, 40 लाखांची फसवणूक, पलाश मुच्छलवर आरोप करणारा अभिनेता विज्ञान माने कोण? राजकारणातही सक्रिय
abp majha web team January 25, 2026 05:13 PM

Vidnyan Mane: संगीतकार आणि गायक पलाश मुच्छल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  कायदेशीर मार्ग निवडत पलाशने मराठी अभिनेता-निर्माता विज्ञान माने याच्याविरोधात 10 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. आपल्यावर करण्यात आलेले फसवणूक आणि चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे आरोप पूर्णपणे खोटे, निराधार आणि बदनामीकारक असल्याचं पलाशचं म्हणणं आहे.

विज्ञान माने याने पलाशवर 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत सांगली पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. याचसोबत पलाश आणि भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना यांच्या वैयक्तिक नात्यांबाबतही गंभीर आरोप सार्वजनिकरित्या करण्यात आले होते. स्मृती-पलाश यांचं लग्न रद्द झाल्याच्या चर्चेमुळे हा वाद अधिकच चिघळला.

कोण आहे विद्यान माने?

विज्ञान माने हा मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि निर्माता आहे. सांगलीचा रहिवासी असलेला 34 वर्षीय विद्यान चित्रपटांबरोबरच राजकारणातही सक्रिय आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्याने मिरज मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी (VBA)कडून निवडणूक लढवली होती.‘विज्ञान माने स्टुडिओज’च्या माध्यमातून त्याने ‘नजऱिया’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल टाकल्याचंही सांगितलं जातं. सोशल मीडियावर तो सामाजिक काम, राजकीय मतं आणि खेळाविषयी पोस्ट करत असतो.

40 लाखांचा वाद

विज्ञान मानेचा दावा आहे की डिसेंबर 2023 पासून एका चित्रपट प्रकल्पासाठी त्याने 40 लाखांची गुंतवणूक केली होती. मात्र हा प्रकल्प अर्धवट राहिल्याने आर्थिक नुकसान झाल्याचं त्याचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर, प्री-वेडिंग कार्यक्रमादरम्यान पलाशच्या कथित गैरवर्तनाचे आरोप करत त्याने वैयक्तिक आयुष्याबाबतही धक्कादायक दावे केले. विज्ञान माने यांच्या म्हणण्यानुसार, तो स्वतः लग्नाच्या कार्यक्रमाला उपस्थित होता. त्यावेळी पलाश मुच्छलला एका महिलेसोबत बेडवर रंगेहात पकडण्यात आले, असा धक्कादायक दावा त्याने केला आहे. शिवाय पलाशने एका चित्रपट प्रकल्पाच्या नावाखाली त्यांच्याकडून सुमारे 40 लाख रुपये गुंतवणूक करून घेतली, मात्र ना चित्रपट तयार झाला, ना पैसे परत मिळाले. माने म्हणाले की, स्मृतीच्या कुटुंबामुळेच त्यांची पलाशशी ओळख झाली होती. पलाशने सहा महिन्यांत चित्रपट पूर्ण होईल, असे सांगितले होते.

पलाश मुच्छलची कायदेशीर भूमिका

या सर्व आरोपांमुळे आपली वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रतिमा मलीन झाल्याचं सांगत पलाश मुच्छलने न्यायालयात धाव घेतली आहे. विज्ञान मानेने केलेले सर्व आरोप खोटे असून त्याचे ठोस पुरावे सादर करण्याचं आव्हान पलाशच्या कायदेशीर टीमकडून देण्यात आलं आहे.या प्रकरणावर आता न्यायालय काय भूमिका घेतं, याकडे संपूर्ण मनोरंजनसृष्टीचं लक्ष लागलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.