खोल समुद्रात मासेमारी करताना चुकून सागरी हद्द ओलांडणारे हिंदुस्थानातील १९९ मच्छीमार पाकिस्तानच्या कैदेत आहेत. यातील एका मच्छीमाराचा आजारपणामुळे रुग्णालयात मृत्यू झाला. भगा परबत असे मृत मच्छीमाराचे नाव असून पालघर-गुजरात सीमेवरील गावातील रहिवासी होते. साडेतीन वर्षांपूर्वीच त्याची शिक्षा पूर्ण झाली होती.
सागरी हद्द ओलांडल्याने पाकिस्तानच्या तटरक्षक दलाने हिंदुस्थानातील १९९ मच्छीमारांना कैदेत ठेवले आहे. यातील १९ मच्छीमार महाराष्ट्रातील आहेत. यामधील बहुतांश मच्छीमारांची शिक्षा दोन ते तीन वर्षांपूर्वीच संपलेली आहे. मात्र प्रशासकीय विलंब, कागदपत्रांची पूर्तता आणि राजनैतिक प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे त्यांची सुटका अद्याप झालेली नाही. कैदेत असलेले भगा परबत हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही मच्छीमारांना तुरुंगात डांबून ठेवणे म्हणजे ही मानवी हक्कांची पायमल्लीच आहे. योग्यवेळी सुटका झाल ी असती तर या मच्छीमाराचा जीव वाचू शकला असता, असे इंडिया-पाकिस्तान डेमोक्रेसी पीपल फोरमच्या सदस्यांनी सांगितले आहे.
सुटका का करत नाही?
मच्छीमारी करत असताना अनेक जण चुकून सागरी हद्द ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जातात. त्याचप्रमाणे पाकिस्तानमधील मच्छीमारदेखील हिंदुस्थानच्या हद्दीत अनेकदा प्रवेश करतात. मात्र शेजार धर्म लक्षात घेऊन अशा अनेक पाकिस्तानी मच्छीमार कैद्यांची सुटका हिंदुस्थान सरकारने यापूर्वी केली आहे. पण पाकिस्तान सरकार मात्र शेजार धर्म पाळत नसल्याचे दिसून येते. या मच्छीमारांची सुटका करण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न का करत नाही, असा सवाल नातेवाईकांनी केला आहे.








