नागपूर भंडारा महामार्गावर नाग नदीच्या पुलावर झालेल्या अपघातात दोन बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. यातील एका बहिणीचा सात महिन्यांपूर्वी विवाह झाला होता तर दुसरीचा महिन्याभराने विवाह होणार होता. दोन्ही बहिणींच्या अपघाती मृत्यूने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अलिशा मेहर आणि मोनाली घाटोळे अशी त्यांची नावे आहेत.
अलिशा आणि मोनाली हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला निघाल्या होत्या. नागपुरातील पिपळा डाक बंगला परिसरात त्या राहत होते. दुचाकीने भुगाव इथं जात असताना मागून येणाऱ्या एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की अलिशा यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या मोनाली यांना रुग्णालयात नेताना त्यांचा मृत्यू झाला.
Nalasopara Crime : डोकं वरवंट्यानं ठेचलं, आईनेच १५ वर्षांच्या लेकीला संपवलं; काय घडलं?सात महिन्यांपूर्वीच अलिशा यांचं लग्न झालं होतं. सुखी संसाराची सुरुवात होऊन वर्षही झालं नव्हतं. त्याआधीच अलिशा यांच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे मोनाली यांचं लग्न अवघ्या महिन्याभराने होणार होता. २६ फेब्रुवारीला त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली होती. पण लगीनघाई सुरू असताना तिच्यावर काळाने घाला घातला.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. दुचाकीला धडक देऊन गेलेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फूटेज तपासलं जात आहे. अलिशा आणि मोनाली या एकमेकींच्या आते-मामे बहिणी होत्या. अपघाताची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास सुरू आहे.