भारत आणि श्रीलंका या देशांकडे संयुक्तरित्या टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद आहे. या स्पर्धेचं संपूर्ण नियोजन झालं असून स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी असून जवळपास निम्म्याहून अधिक संघ जाहीर झाले आहेत. असं असताना यात आणखी एका संघाची भर पडली. वेस्ट इंडिजने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. वेस्ट इंडिजने टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद दोनदा मिळवलं आहे. हे विसरून चालणार नाही. भारतात 2016 मध्ये स्पर्धेचं आयोजन केलं होतं. तेव्हा वेस्ट इंडिजने इंग्लंडला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं होतं. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी कर्णधारपदाची धुरा शाई होपच्या खांद्यावर दिली आहे. तर शिमरॉन हेटमायर यालाही संघात स्थान मिळाली आहे. जेसन होल्डर, जॉन्सन चार्ल्स, ब्रँडन किंग यांनाही संघात स्थान मिळालं आहे.
सात दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या क्वेंटिन सॅम्पसनचा संघात संधी देण्यात आली आहे. कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. नऊ सामन्यांमध्ये 34.43 च्या सरासरीने आणि 151.57 च्या स्ट्राईक रेटने 241 धावा केल्या होत्या. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. जेसन होल्डर , रोवमन पॉवेल आणि रोमारियो शेफर्ड हे सर्व परतले आहेत. शमार जोसेफचाही विश्वचषक संघात समावेश करण्यात आला आहे. होल्डर, मॅथ्यू फोर्ड आणि जेडेन सील्स हे वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील.
वेस्ट इंडिजचा संघ क गटात आहे. या गटात यापूर्वी बांगलादेशचा संघ होता. पण आता त्याची जागा स्कॉटलँड संघाने घेतली आहे. त्यामुळे 7 फेब्रुवारीला वेस्ट इंडिजचा पहिला सामना स्कॉटलँडशी होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात होणार आहे. 11 फेब्रुवारीला इंग्लंड, त्यानंतर 15 फेब्रुवारीला नेपाळशी आणि 19 फेब्रुवारीला इटलशी सामना होणार आहे. या गटात इंग्लंड आणि वेस्ट इंडिज हे दोन तगडे संघ आहेत. त्यामुळे या गटातून या दोन संघांना पुढच्या फेरीचं तिकीट मिळू शकतं. पण टी20 क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. त्यामुळे एखाद दुसरा उलटफेर झाला तर चित्र बदलू शकतं.
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी वेस्ट इंडिज संघ: शाई होप (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, मॅथ्यूज फोर्ड, जेसन होल्डर, अकील हुसेन, शेमार जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोटी, रोवमन पॉवेल, शेरफेन रुदरफोर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, जेडेन सील्स, रोमारियो शेफर्ड.